जसप्रीत बुमराह अडकणार विवाहबंधनात? तयारीसाठी कसोटीतून माघार घेतल्याची शक्यता 

बुमराह चौथ्या कसोटी सामन्याला मुकणार आहे.

jasprit bumrah
जसप्रीत बुमराह

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीतून वैयक्तिक कारणांमुळे माघार घेतली होती. भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या कसोटी मालिका सुरु आहे. चार सामन्यांच्या या मालिकेत भारताकडे २-१ अशी आघाडी आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना ४ मार्चपासून अहमदाबाद येथे नव्याने बांधण्यात आलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार असून बुमराह या सामन्याला मुकणार आहे. त्याने वैयक्तिक कारण असल्याचे सांगत या कसोटीत न खेळण्याचा निर्णय घेतला होता. आता हे वैयक्तिक कारण स्पष्ट झाले आहे. एएनआयला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुमराह लवकरच विवाहबंधनात अडकणार असून त्याची तयारी करण्यासाठी त्याने चौथ्या कसोटीतून माघार घेतली.

टी-२० मालिकेसाठीही विश्रांती

बुमराहने विवाहबंधनात अडकणार असल्याचे सांगून लग्नाच्या तयारीसाठी वेळ मिळावा म्हणून चौथ्या कसोटीत खेळणार नसल्याचे बीसीसीआयला सांगितले, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. २७ वर्षीय बुमराहने सध्या सुरु असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दोन सामन्यांत चार विकेट घेतल्या. त्याला दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली होती. तसेच त्याला आगामी पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठीही विश्रांती देण्यात आली आहे.