घरक्रीडाIPL चा करोडपती गोलंदाज, तरीही टीम इंडियातून ड्रॉप? कारण आले समोर

IPL चा करोडपती गोलंदाज, तरीही टीम इंडियातून ड्रॉप? कारण आले समोर

Subscribe

२०१८ नंतर त्याला भारताकडून खेळण्याची संधी मिळालेली नाही.

आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी काही दिवसांपूर्वी भारताचा कसोटी संघ जाहीर करण्यात आला होता. या संघामध्ये सहा वेगवान गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे. परंतु, डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटला संधी मिळालेली नाही. आयपीएलच्या २०१८ खेळाडू लिलावात उनाडकटला राजस्थान रॉयल्सने तब्बल ११.५ कोटी रुपयांत खरेदी केले होते. त्यानंतर त्याला आयपीएलमध्ये फारसा प्रभाव पाडता आला नाही. परंतु, त्याने २०१९-२० रणजी करंडकात सौराष्ट्रसाठी तब्बल ६७ विकेट घेतल्या होत्या. मात्र, मागील ऑस्ट्रेलिया दौरा किंवा आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी त्याची भारताच्या कसोटी संघात निवड झाली नाही. स्थानिक क्रिकेटमधील दमदार कामगिरीनंतरही भारतीय संघात संधी का मिळत नाही? असा उनाडकटला प्रश्न पडला आहे. सौराष्ट्राचे माजी प्रशिक्षक करसन घावरी यांनी काही काळापूर्वी निवड समिती सदस्याशी याबाबत चर्चा केली होती.

निवड होण्यात वयाचा अडथळा  

एखाद्या गोलंदाजाने रणजीच्या एका मोसमात ६० हून अधिक विकेट घेतल्या असतील आणि त्याने केलेल्या कामगिरीमुळे त्याच्या संघाने अंतिम फेरी गाठली असेल, तर त्या गोलंदाजाला भारत ‘अ’ संघात तरी संधी मिळायला नको का? असा प्रश्न मी २०१९-२० रणजी करंडकाच्या अंतिम सामन्याच्या वेळी निवड समितीच्या सदस्याला विचारला होता. ‘उनाडकटला यापुढे भारताकडून खेळण्याची संधी मिळणार नाही. आम्ही ३० सदस्यीय संघ निवडतानाही त्याचा विचार करत नाही. तो आताच ३२-३३ वर्षांचा आहे. त्याची भारतीय संघात निवड होण्यात वयाचा अडथळा आहे,’ असे निवड समितीच्या सदस्याने सांगितल्याचे घावरी म्हणाले.

अखेरचा सामना तीन वर्षांपूर्वी 

२९ वर्षीय उनाडकटने २०१९-२० दमदार कामगिरी केली, त्यावेळी घावरी हे सौराष्ट्र संघाचे प्रशिक्षक होते. उनाडकटने भारतासाठी आतापर्यंत ७ कसोटी, ७ वनडे आणि १० टी-२० सामने खेळले आहेत. मात्र, २०१८ नंतर त्याला भारताकडून खेळण्याची संधी मिळालेली नाही. त्याने अखेरचा टी-२० सामना मार्च २०१८ मध्ये बांगलादेशविरुद्ध खेळला होता.
Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -