Junior Kho-Kho : महाराष्ट्र्राच्या दोन्ही संघांना जेतेपद

 ज्युनियर राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत गतविजेत्या महाराष्ट्राच्या मुले आणि मुली या दोन्ही संघांनी आपले जेतेपद कायम राखले आहे.

राष्ट्रीय खो-खो स्पर्धा
भोपाळ, मध्यप्रदेश येथे झालेल्या ज्युनियर राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत गतविजेत्या महाराष्ट्राच्या मुले आणि मुली या दोन्ही संघांनी आपले जेतेपद कायम राखले आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुलांच्या संघाने कोल्हापूरचा तर मुलींच्या संघाने कर्नाटकचा पराभव केला.

वृषभ वाघ ठरला सर्वोत्कृष्ठ खेळाडू

मुलांच्या गटातील अंतिम सामन्यात महाराष्ट्राने कोल्हापूरचा १२-११ असा अवघ्या एका गुणाने पराभव केला. चुरशीच्या झालेल्या या सामन्यात कर्णधार वृषभ वाघने चमकदार कामगिरी केली. त्याने या सामन्यात २:०० आणि २:०० मिनिटे संरक्षण करत १ गडी बाद केला. तसेच त्याने या स्पर्धेत केलेल्या अप्रतिम कामगिरीमुळे त्याला सर्वोत्कृष्ठ खेळाडूचा वीर अभिमन्यू पुरस्कार मिळाला. त्याला अंतिम सामन्यात राहुल मंडलने २:०० आणि २:०० मिनिटे संरक्षण तर दिलीप खंडवीने १:३० आणि २:३० मिनिटे संरक्षण, २ गडी बाद करत चांगली साथ दिली. तत्पूर्वी महाराष्ट्राच्या मुलांनी उपांत्य फेरीत कर्नाटकचा ११-०८ असा पराभव केला होता.

मुलींच्या गटात रेश्मा राठोड सर्वोत्कृष्ठ खेळाडू

मुलींच्या गटातील अंतिम सामन्यात महाराष्ट्राने कर्नाटकवर ११-९ असा विजय मिळवला. महाराष्ट्राची कर्णधार रेश्मा राठोडने या सामन्यात अप्रतिम खेळ केला. तिने ३:०० आणि २:२० मिनिटे संरक्षण करत १ गडी बाद केला. तसेच तिला मुलींच्या गटात सर्वोत्कृष्ठ खेळाडूचा जानकी पुरस्कार मिळाला. तिला अंतिम सामन्यात स्नेहल जाधवने २:०० आणि २:१० मिनिटे संरक्षण करत तर प्राजक्ता पवारने १:४० आणि २:०० मिनिटे संरक्षण, ३ बळी घेत चांगली साथ दिली. त्याआधी महाराष्ट्राच्या मुलींनी उपांत्य फेरीत दिल्लीचा ११-०४ असा धुव्वा उडवला होता.