न्यूझीलंडची ‘विल’पॉवर

न्यूझीलंडला मार्टिन क्रो, ग्लेन टर्नर, स्टिफन फ्लेमिंग, ब्रेंडन मॅक्युलम आणि रॉस टेलर यांसारखे चांगले फलंदाज लाभले. मात्र, या सर्वांना पिछाडत विल्यमसन न्यूझीलंडच्या क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरला आहे. वयाच्या ३० व्या वर्षीच! फलंदाज म्हणून विल्यमसनने त्याचा लौकिक सिद्ध केला आहेच, पण तो कर्णधार म्ह्णूनही तितकाच उत्कृष्ट आहे. विल्यमसनच्या नेतृत्वात न्यूझीलंडने २०१९ वर्ल्डकपची अंतिम फेरी गाठली होती. न्यूझीलंडने पुढेही दमदार खेळ सुरु ठेवला असून आता कसोटी क्रमवारीत हा संघ पहिल्यांदाच अव्वल स्थानी पोहोचला आहे.

kane williamson
केन विल्यमसन

भारत आणि ऑस्ट्रेलिया हे जागतिक क्रिकेटमधील सध्याच्या घडीचे सर्वोत्तम संघ. या दोन बलाढ्य संघांमध्ये सुरू असलेल्या कसोटी मालिकेकडे संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष आहे. मात्र, त्याचवेळी न्यूझीलंडने घरच्या मैदानावर दमदार कामगिरी केल्याचे फार कोणाला लक्षात आले नाही. न्यूझीलंडने सलग दोन कसोटी मालिकांमध्ये वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांना व्हाईटवॉश दिला. त्याआधी मागील वर्षीच्या सुरुवातीला त्यांनी भारताविरुद्ध २-० असे निर्भेळ यश संपादले होते. या कामगिरीच्या आधारे न्यूझीलंडने कसोटी क्रमवारीत पहिल्यांदा अव्वल स्थानी झेप घेतली असून न्यूझीलंडच्या या यशात सर्वात प्रमुख भूमिका आहे, कर्णधार केन विल्यमसनची.

विंडीजविरुद्ध २५१ आणि त्यापाठोपाठ पाकिस्तानविरुद्ध १२९ व २३८ ही विल्यमसनची मागील तीन कसोटीतील कामगिरी. या कामगिरीच्या जोरावर त्याने कसोटी क्रमवारीत फलंदाजांमध्ये अव्वल स्थान पटकावले. स्टिव्ह स्मिथ आणि विराट कोहली यांसारख्या फलंदाजांना मागे टाकत अव्वल स्थान पटकावणे सोपे नाही, पण विल्यमसनने ही किमया साधली. न्यूझीलंडला मार्टिन क्रो, ग्लेन टर्नर, स्टिफन फ्लेमिंग, ब्रेंडन मॅक्युलम आणि रॉस टेलर यांसारखे चांगले फलंदाज लाभले. मात्र, या सर्वांना पिछाडत विल्यमसन न्यूझीलंडच्या क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरला आहे. वयाच्या ३० व्या वर्षीच!

विल्यमसनने आपल्या कसोटी कारकिर्दीत ८३ सामन्यांत ७११५ धावा केल्या असून यात २४ शतकांचा समावेश आहे. वीस कसोटी शतकांचा टप्पा ओलांडणारा विल्यमसन हा न्यूझीलंड क्रिकेट इतिहासातील पहिलाच फलंदाज असून किवीजकडून सर्वाधिक कसोटी धावा करण्याच्या बाबतीत त्याचा तिसरा क्रमांक लागतो. सध्या ‘फॅब फोर’चे जागतिक क्रिकेटवर अधिराज्य असून यात कोहली, स्मिथ, रूट यांच्यासह विल्यमसनचा समावेश आहे. या चौघांच्या फलंदाजीच्या शैलीत बराच फरक आहे, हे विशेष. विल्यमसन त्याच्या तंत्रशुद्ध आणि संयमी फलंदाजीसाठी ओळखला जातो. तसेच चेंडू उशिरा खेळण्याची कला विल्यमसनला अवगत आहे. या गुणांमुळेच तो केवळ कसोटीच नाही, तर एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये इतका यशस्वी ठरला आहे.

फलंदाज म्हणून विल्यमसनने त्याचा लौकिक सिद्ध केला आहेच, पण तो कर्णधार म्हणूनही तितकाच उत्कृष्ट आहे. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीप्रमाणे विल्यमसनलाही ‘कॅप्टन कूल’ म्हणून संबोधले जाऊ शकते. विल्यमसन आणि धोनीमध्ये तसे बरेच साम्य आहे. भारतीय संघ आक्रमक शैलीत, प्रतिस्पर्ध्याला जशास तसे उत्तर देण्यासाठी आता ओळखला जातो. याची सुरुवात झाली होती ती सौरव गांगुलीपासून. गांगुलीने नव्या भारताचा पाया रचला आणि धोनीने त्यावर कळस चढवला. असेच काहीसे न्यूझीलंडचे. पूर्वी न्यूझीलंडचा संघ भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड या संघांच्या छायेत होता. मात्र, न्यूझीलंडच्या संघाला नवी ओळख मिळवून दिली ती कर्णधार ब्रेंडन मॅक्युलमने. मॅक्युलम त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जायचा. त्याचे नेतृत्वही तितकेच आक्रमक होते.

मॅक्युलमने नव्या न्यूझीलंडचा पाया रचला आणि त्याच्या निवृत्तीनंतर कर्णधार म्हणून विल्यमसनने न्यूझीलंडला एक पाऊल पुढे नेले. विल्यमसनच्या नेतृत्वात न्यूझीलंडने २०१९ वर्ल्डकपची अंतिम फेरी गाठली होती. अंतिम फेरीत नियमित सामना आणि सुपर ओव्हर बरोबरीत राहिल्याने सर्वाधिक चौकार-षटकार मारणाऱ्या संघाला विजेता ठरवण्यात आले. यजमान इंग्लंडने न्यूझीलंडवर विजय मिळवत वर्ल्डकप जिंकला खरा, पण या सामन्यात पराभव न्यूझीलंडचा झाला की आयसीसीच्या नियमांचा? हा खरा प्रश्न होता. मात्र, यानंतरही न्यूझीलंडने दमदार खेळ सुरु ठेवला असून आता या संघाने कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच अव्वल स्थानी झेप घेतली आहे. त्यामुळे फलंदाज आणि कर्णधार म्हणून विल्यमसनचे कौतुक करावे तितके कमीच!