‘मी त्याच्या कानाखाली वाजवेन..’ भारतीय संघातील खेळाडूवर भडकले कपिल देव

भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी भारतीय संघातील एका खेळाडूबद्दल बोलताना संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. रिषभ पंत लवकरात लवकर बरा व्हावा, अशी मी प्रार्थना करतो. पण त्यानंतर मी त्याच्या कानाखाली वाजवेन, असेही ते रागाच्या भरात म्हणाले आहेत.

नागपूर येथे उद्यापासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघामध्ये कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या सामन्यांसाठी भारताचा संघ नागपूर येथे दाखल झाला आहे. पण या कारणामुळे आता भारताचे माजी कर्णधार कपिल देव हे भारताचा दुखापतग्रस्त असलेला खेळाडू रिषभ पंत याच्यावर चांगलेच भडकले आहेत. रिषभ पंत हा कसोटी सामन्यांमध्ये खेळण्यासाठी उत्तम खेळाडू आहे. पण त्याच्या नसण्याने भारतीय संघाला त्याची उणीव भासणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

एका मुलाखतीमध्ये बोलताना कपिल देव म्हणाले की, ‘रिषभ पंत लवकर बरा व्हावा अशी माझी इच्छा आहे आणि जेव्हा तो बरा होईल तेव्हा मी जाऊन त्याच्या कानाखाली वाजवेन, कारण त्याच्या दुखापतीने संपूर्ण संघाचे नियोजन खराब केले. आजच्या तरुणांना अशा प्रकारची जोखीम घेण्याची काय गरज आहे? तरुण पिढीच्या अशा चुकांमुळे मला संताप येतो,’ असे म्हणत त्यांनी आपला राग व्यक्त केला आहे.

पुढे कपिल देव म्हणाले की, ‘रिषभ एक उत्कृष्ट विकेटकिपर असण्यासोबतच तो जबरदस्त फलंदाज देखील आहे. उद्या पासून सुरु होत असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या कसोटी सिरीजमध्ये त्याची अनुपस्थिती भारतीय संघाकरता मोठी हानी आहे. रिषभ कसोटी सामन्यांमध्ये जलद धावा करतो त्याचा खेळ हा कसोटी क्रिकेटसाठी पूरक आहे. तेव्हा या सिरीजमध्ये भारतीय संघाला त्याची उणीव नक्कीच भासेल. मी देवाकडे प्रार्थना करो की रिषभ पंत लवकर बरा होऊ दे!’

हेही वाचा – ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ जाहीर

30 डिसेंबर 2022 दिवशी रिषभ पंत याच्या गाडीला दिल्ली येथे अपघात झाला होता. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये रीषभची गाडी जळून खाक झाली होती. पण सुदैवाने तो या अपघातातून थोडक्यात बचावला. पण यामध्ये त्याला गंभीर दुखापत झाली. मागील महिन्याभरापासून त्याच्यावर मुंबई येथील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रिषभच्या पायावर शस्त्रक्रिया झाल्याने तो पुढील काही काळासाठी दूर राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, कपिल देव यांनी संघातील खेळाडूंना त्यांची गाडी चालवण्यासाठी ड्रायव्हर ठेवण्याचा सल्ला दिला आहे. याबद्दल बोलताना ते म्हणाले की, “तुमच्याकडे खूप वेगवान कार आहे पण तुम्हाला तुमची काळजी घेणे आवश्यक आहे. तुम्हाला गाडी चालवण्यासाठी ड्रायव्हर ठेवणं सहज परवडू शकत, तेव्हा तुम्हाला गाडी एकट्याने चालवण्याची गरज नाही. मी समजू शकतो की एखाद्याला अशा गोष्टीचा छंद किंवा आवड असते तरुण वयात ते असणे स्वाभाविक आहे, परंतु तुमच्याकडून भारतीय संघाला काही अपेक्षा आहेत, संघाप्रती तुमची काही जबाबदारी आहे.  तेव्हा अशा प्रकारचा निष्काळजीपणा न करता स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे.”