नवी दिल्ली : आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक 2023 स्पर्धेच्या (ICC ODI World Cup 2023) अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा पराभव केला. त्यामुळे भारतीय संघाचे तिसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंगले. मात्र या सामन्यात भारताचा माजी कर्णधार कपिल देव यांना निमंत्रित करण्यात आले नसल्यामुळे वाद रंगला होता. मात्र त्यानंतरही निराशेच्या गर्तेत बुडालेल्या भारतीय संघाला 1983 चा विश्वचषक विजेता कर्णधार कपिल देव यांचा पाठिंबा मिळाला आहे. पराभवानंतर चुकांमधून शिकून पुढे जाण्याची वेळ आली आहे, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. (No invitation to World Cup match but Kapil Dev supports Indian team after defeat)
हेही वाचा – IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया T-20 मालिकेचे Live प्रक्षेपण ‘इथे’ पाहता येणार
कपिल देव यांना पराभवानंतर भारतीय खेळाडूंना धक्का बसला आहे का? भारतीय खेळाडूंना तुम्ही काय सांगाल? असे प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांना उत्तर देताना कपिल देव म्हणाले की, खेळाडूंना पुढे जावे लागेल. तुम्ही असे म्हणू शकत नाही की तुमचा पराभव झाला असेल तर ते आयुष्यभर तुमच्यासोबत राहिल. जे घडले ते बदलता येत नाही. त्यामुळे मेहनत करत राहायला पाहिजे. खेळाडू होण्याचा हाच अर्थ आहे. सर्वांना चांगले क्रिकेट खेळले, मात्र त्यांना शेवटचा अडथळा पार करता आला नाही. या चुकीतून आपण काय शिकू शकतो, याकडे लक्ष दिले पाहिजे, असे कपिल देव म्हणाले.
अंतिम सामन्याच्या दिवशी कपिल देव यांची अनुपस्थित
विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात कपिल देव स्टेडियममध्ये उपस्थित नव्हते. यावर त्यांनी भाष्य करताना म्हटले की, मला निमंत्रण नव्हते. मला बोलावले म्हणून, मी येथे आलो, तिकडे बोलावले नाही, मी गेलो नाही. एवढीच गोष्ट आहे. माझ्या 1983मधील सर्व संघाला बोलावायला पाहिजे होते, अशी माझी इच्छा होती. पण एवढे काम चालू आहे, खूप लोक, खूप जबाबदाऱ्या आहेत. कधीकधी लोक विसरतात, असे कपिल देव म्हणाले. दरम्यान, कपिल देव यांना बोलावले नसल्यामुळे विरोधकांनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता.
हेही वाचा – सूर्यकुमार कर्णधार कसा? क्रिकेट चाहते संतापले; म्हणाले, 2 खेळाडूंवर अन्याय
ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा जिंकाल विश्वचषक
दरम्यान सामन्याबद्दल बोलायचे झाले तर ऑस्ट्रेलिया कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ केवळ 240 धावा करू शकला. केएल राहुलने सर्वाधिक 66 धावांची संथ खेळी तर विराट कोहलीने 54, रोहित शर्मा 47 धावांचे आणि सूर्यकुमार यादवने 18 धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूडने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. भारताकडून मिळालेल्या 241 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाने 4 विकेट गमावून सामना जिंकत सहाव्यांदा विजेतेपद पटकावले. या सामन्यात ट्रॅव्हिस हेडने शतकी खेळी करत ऑस्ट्रेलियाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. त्याने 120 चेंडूंत 137 धावांची सर्वाधिक खेळी केली. याशिवाय मार्नस लॅबुशेनने नाबाद 58 धावांची खेळी करत त्याला चांगली साथ दिली. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 2 तर, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.