घरक्रीडाकिशोरांमध्ये महाराष्ट्र ,किशोरींमध्ये ओडिसा अजिंक्य

किशोरांमध्ये महाराष्ट्र ,किशोरींमध्ये ओडिसा अजिंक्य

Subscribe

राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा

रांची, अल्बर्ट अ‍ॅक्वा खो खो स्टेडियम, रांची, झारखंड येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय किशोर-किशोरी अजिंक्यपद स्पर्धेत किशोरांमध्ये महाराष्ट्र तर किशोरींमध्ये ओडिसा अजिंक्य ठरले. या स्पर्धेत केलेल्या सर्वोत्कृष्ट खेळासाठी किशोरांमध्ये महाराष्ट्र, उस्मानाबादच्या रमेश वसावेला भरत पुरस्काराने तर किशोरींमध्ये ओडिसाच्या अनन्या प्रधानला इला पुरस्काराने गौरवण्यात आले. आज झालेल्या किशोरांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने ओडिसाचा 15-07 असा एक डाव 08 गुणांनी पराभव करत अजिंक्यपदाला गवसणी घातली. महाराष्ट्राच्या गणेश बोरकरने 2:10 मि. संरक्षण केले, अजय कश्यपने 1:50, 3:00 मी. संरक्षण केले व दोन गडी बाद केले व सामना महाराष्ट्राच्या बाजूने झुकवला. तर स्पर्धेत सर्वोत्कृष्ट ठरलेल्या रमेश वसावेने 1:30, 1:30 मी. संरक्षण केले व एक गडी बाद केला व अजिंक्यपदात सिंहाचा वाटा उचलला. पराभूत ओडिसाच्या बाबली तपनने 1:10 मी. संरक्षण केले. रोहित व विशालने प्रत्येकी 02-02 गडी बाद करत जोरदार लढत देण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो अयस्वी ठरला व महाराष्ट्राने अजिंक्यपदावर नाव कोरले. किशोरींच्या अंतिम सामन्यात ओडिसाने महाराष्ट्राचा 15-08 असा 07 गुणांनी पराभव करत अजिंक्यपदावर नाव कोरले. ओडिसाच्या अनन्या प्रधानने 2:50 मी. संरक्षण केले, शिबानी गौतमने 2:10 मी. संरक्षण केले व एक खेळाडूला बाद केले, तर मोंजका नायकने तब्बल सहा खेळाडू बाद करत अजिंक्यपद पक्के केले, तर महाराष्ट्राच्या दिपाली राठोडने 2:30 मी. संरक्षण केले, प्रीती मांगलेने 2:20 मी. संरक्षण केले, संध्या सुर्वेने 1:20 मी. संरक्षण केले तर सानिका निकमने दोन खेळाडूंना घरचा रस्ता दाखवत सामन्यात रंगत भरण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो यशस्वी झाला नाही व या लढतीत शेवटी महाराष्ट्राला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -