Denmark Open : किदाम्बी श्रीकांतचा दुसऱ्या फेरीत प्रवेश  

श्रीकांतने इंग्लंडच्या टोबी पेंटीवर मात केली.   

Kidambi Srikanth
किदाम्बी श्रीकांत

भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतला डेन्मार्क ओपन स्पर्धेची विजयी सुरुवात करण्यात यश आले. त्याने पहिल्या फेरीच्या सामन्यात चांगला खेळ करत इंग्लंडच्या टोबी पेंटीवर सरळ गेममध्ये मात केली. कोरोनामुळे बॅडमिंटनच्या सर्व स्पर्धा बंद होत्या. मात्र, सात महिन्यांनंतर डेन्मार्क ओपनपासून बँडमिंटन स्पर्धांना पुन्हा सुरुवात झाली आहे. भारताच्या बॅडमिंटनपटूंनी बॅडमिंटन कोर्टवर दमदार पुनरागमन करण्यात यश आले आहे. श्रीकांतच्या आधी लक्ष्य सेनने मंगळवारी आपला पहिल्या फेरीतील सामना सहजपणे जिंकला होता.

पुढील फेरीत हो-शूईशी सामना

पाचव्या सीडेड श्रीकांतने बुधवारी झालेल्या पहिल्या फेरीतील सामन्यात इंग्लंडच्या टोबी पेंटीचा २१-१२, २१-१८ असा सरळ गेममध्ये पराभव केला. ३७ मिनिटे चाललेल्या या सामन्याची श्रीकांतने अप्रतिम सुरुवात करत पहिला गेम २१-१२ असा नऊ गुणांच्या फरकाने जिंकला. दुसऱ्या गेममध्ये मात्र पेंटीने त्याच्या खेळात सुधारणा करत श्रीकांतला झुंज दिली. परंतु, श्रीकांतनेही मोक्याच्या क्षणी त्याचा खेळ उंचावत हा गेम २१-१८ असा जिंकला आणि स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. या फेरीत त्याचा कॅनडाच्या जेसन अँथनी हो-शूईशी सामना होईल. हो-शूईने पहिल्या फेरीत भारताच्याच शुभांकर डेवर २१-१३, २१-८ अशी मात केली.

लक्ष्य सेनचीही विजयी सुरुवात 

त्याआधी लक्ष्य सेनने क्रिस्टो पोपोव्हचा २१-९, २१-१५ असा पराभव करत स्पर्धेत विजयी सलामी दिली होती. आता दुसऱ्या फेरीच्या सामन्यात त्याच्यासमोर डेन्मार्कच्या हांस-क्रिस्टियन सोलबर्ग विटिंगहॉसशी सामना होणार आहे. बिनसीडेड विटिंगहॉसने बेल्जियमच्या मॅक्सिम मोरेल्सवर २१-१३, २१-८ अशी मात करत दुसरी फेरी गाठली होती.