IND vs ENG 5th T20 : लोकेश राहुलला डच्चू; इंग्लंडचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय 

राहुलला या मालिकेच्या पहिल्या चार सामन्यांत चांगली कामगिरी करण्यात अपयश आले.

kl rahul
लोकेश राहुल

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा व निर्णायक सामना शनिवारी खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी भारताने संघात एक बदल केला असून सलामीवीर लोकेश राहुलच्या जागी डावखुरा वेगवान गोलंदाज टी. नटराजनला संघात स्थान देण्यात आले आहे. ‘आम्ही संघात एक बदल केला आहे. राहुलला आम्हाला वगळावे लागत आहे आणि मी रोहित शर्माच्या साथीने सलामीला खेळणार आहे. आम्हाला सूर्यकुमार यादवला अधिक संधी द्यायच्या आहेत. तो आमच्यासाठी एक्स-फॅक्टर ठरू शकेल असे मला वाटते,’ असे भारताचा कर्णधार विराट कोहली नाणेफेकीच्या वेळी म्हणाला.

नटराजनचा संघात समावेश

राहुलला या मालिकेच्या पहिल्या चार सामन्यांत चांगली कामगिरी करण्यात अपयश आले. पहिल्या सामन्यात त्याने केवळ १ धाव केली, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात त्याला खातेही उघडता आले नाही. चौथ्या सामन्यात त्याला १७ चेंडूत १४ धावाच करता आल्या. त्यामुळे आजच्या निर्णायक सामन्यासाठी त्याला भारतीय संघातून वगळण्यात आले आहे. त्याच्या जागी नटराजनचा संघात समावेश करण्यात आला आहे. नटराजनच्या समावेशाने भारताची गोलंदाजी अधिक मजबूत झाली आहे. भारताकडे आता सहा गोलंदाजांचे पर्याय आहेत.