कोहलीच कर्णधारपदी योग्य!

गावस्करांच्या मताशी मांजरेकर असहमत

इंग्लंडमध्ये झालेला विश्वचषक जिंकण्यासाठी भारतीय संघाला प्रमुख दावेदार मानले जात होते. मात्र, साखळी सामन्यांमध्ये सातत्यपूर्ण प्रदर्शन केल्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीतील सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, असे असतानाही निवड समितीने औपचारिक बैठक न घेता कोहलीला कर्णधारपदी कसे कायम कसे ठेवले असा सवाल भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी उपस्थित केला होता. तसेच निवड समितीच्या सदस्यांना तितकेसे महत्त्व नाही, असेही ते म्हणाले होते. मात्र, गावस्करांच्या या मताशी भारताचा माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेट समीक्षक संजय मांजरेकर सहमत नाही.

मी गावस्कर सरांचा आदर राखून सांगतो की, भारतीय निवड समिती आणि विराटला कर्णधारपदी कायम ठेण्याबाबत त्यांचे जे मत आहे, त्याच्याशी मी सहमत नाही. भारतीय संघाचे विश्वचषकातील प्रदर्शन चांगले नव्हते, असे म्हणणे योग्य ठरणार नाही. त्यांनी ७ सामने जिंकले आणि केवळ २ सामने गमावले. शेवटचा सामना भारताने फार कमी फरकाने गमावला. निवड समितीबाबत बोलायचे तर निवडकर्त्यांसाठी पद, प्रतिष्ठेपेक्षा प्रामाणिकपणा हा जास्त महत्त्वाचा गुण आहे, असे संजय मांजरेकरने आपल्या ट्विटमध्ये लिहिले.

भारतीय संघ आता विश्वचषक न जिंकल्याची निराशा विसरून वेस्ट इंडिज दौर्‍यासाठी सज्ज झाला आहे. या दौर्‍यात भारत ३ टी-२०, ३ एकदिवसीय आणि २ कसोटी सामने खेळणार आहे. कोहलीची कर्णधार म्हणून निवड विश्वचषकापर्यंतच होती आणि त्यामुळेच या दौर्‍यासाठी संघ निवडण्याआधी निवड समितीने कर्णधाराबाबत बैठक घ्यायला हवी होती, असेही मत सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले.