घरक्रीडाकोहलीला आक्रमकपणा कमी करण्याची गरज नाही!

कोहलीला आक्रमकपणा कमी करण्याची गरज नाही!

Subscribe

मदन लाल यांचे मत

भारताचा कर्णधार विराट कोहली आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखला जातो. हा आक्रमकपणा त्याच्यासाठी बर्‍याचदा फायदेशीर ठरला, तर काहीवेळा यानेच त्याचा घात केला आहे. नुकत्याच झालेल्या न्यूझीलंड दौर्‍यातील कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहने केन विल्यमसनला माघारी पाठवल्यानंतर कोहलीने जोरदार जल्लोष केला.

सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत एका स्थानिक पत्रकाराने तू विल्यमसनला शिवी दिलीस, भारतीय कर्णधार म्हणून तू मैदानावर अशाप्रकारे वागणे योग्य आहे का, असा प्रश्न कोहलीला विचारला. त्याला हे फारसे आवडले नाही आणि तो पत्रकावर संतापला. कोहलीने थोडा संयम दाखवला पाहिजे, असे मत क्रिकेट समीक्षक बरेचदा व्यक्त करतात. मात्र, कोहलीला आक्रमकपणा कमी करण्याची गरज नाही, असे भारताचे माजी क्रिकेटपटू आणि बीसीसीआयच्या सल्लागार समितीचे सदस्य मदन लाल यांना वाटते.

- Advertisement -

भारताला आक्रमक कर्णधाराची गरज आहे असे आधी लोकांना वाटायचे आणि आता कोहलीने त्याचा आक्रमकपणा कमी केला पाहिजे असे तुम्ही म्हणता. त्याचा मैदानातील वावर मला खूप आवडतो. पूर्वी बाहेरचे लोक म्हणायचे की, भारतीय आक्रमक नसतात आणि आता अचानक आपण आक्रमक झालो आहोत. भारतीयांमध्ये इतका आक्रमकपणा कशासाठी आहे असा प्रश्न आता उपस्थित केला जातो. कोहलीला आक्रमकपणा कमी करण्याची गरज नाही. आपल्याला त्याच्यासारख्या कर्णधाराची गरज आहे, असे मदन लाल एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.

तो दमदार पुनरागमन करेल!
विराट कोहलीला न्यूझीलंड दौर्‍याच्या ११ डावांत मिळून केवळ १ अर्धशतक करता आले. मात्र, तो दमदार पुनरागमन करेल याची मदन लाल यांना खात्री आहे. कोहली फॉर्मात नव्हता. त्याचा आत्मविश्वास थोडा कमी झाला होता असेही आपण म्हणू शकतो. न्यूझीलंडमध्ये चांगली कामगिरी करता आली नसली तरी कोहली अजूनही जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे. तो दमदार पुनरागमन करेल, असा विश्वास मदन लाल यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

विराट सर्वात शक्तिशाली क्रिकेटपटू – र्‍होड्स
विराट कोहली हा भारतीय संघातील सर्वात शक्तिशाली क्रिकेटपटू आहे. तो वर्षानुवर्षे सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. तो केवळ उत्कृष्ट फलंदाजच नाही, तर चांगला कर्णधारही आहे. तो एक परिपूर्ण क्रिकेटपटू आहे. भारताचा संपूर्ण संघच खूप प्रतिभावान आहे, असे दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जॉन्टी र्‍होड्स म्हणाला. ३१ वर्षीय कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत ७० शतके केली आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -