कोहलीचा विस्डेनकडून सन्मान!

दशकातील सर्वोत्तम पाच क्रिकेटपटूंच्या यादीत स्थान

virat kohali
विराट कोहली

क्रिकेटचे बायबल म्हणून ओळखल्या जाणार्‍या विस्डेनने भारताचा कर्णधार विराट कोहलीचा सन्मान केला आहे. विस्डेनच्या या दशकातील (२०१०-२०१९) सर्वोत्तम पाच क्रिकेटपटूंच्या यादीत कोहलीला स्थान देण्यात आले आहे. कोहलीसोबतच या यादीत दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू डेल स्टेन आणि एबी डिव्हिलियर्स, ऑस्ट्रेलियाचा खेळाडू स्टिव्ह स्मिथ, तसेच ऑस्ट्रेलियाची महिला अष्टपैलू खेळाडू एलिस पेरीचा समावेश करण्यात आला आहे.

३१ वर्षीय कोहली सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखला जातो. त्याने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत (कसोटी, एकदिवसीय, टी-२०) सातत्यपूर्ण कामगिरी करत अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. मागील दहा वर्षांत कोहलीने इतर कोणत्याही फलंदाजापेक्षा ५,७७५ जास्त आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी विस्डेनने दक्षकातील सर्वोत्तम कसोटी आणि एकदिवसीय संघांची घोषणा केली होती. कोहलीची कसोटी संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली होती, तर एकदिवसीय संघातही त्याचा समावेश होता.

कोहलीने प्रत्येक आव्हानावर वारंवार मात करत स्वतःला सिद्ध केले आहे. २०१४ सालच्या इंग्लंड दौर्‍यानंतर ते यावर्षी नोव्हेंबरमध्ये कोलकाता येथे झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यापर्यंत, कोहलीने ६३ च्या सरासरीने धावा केल्या. यात २१ शतके आणि १३ अर्धशतकांचा समावेश होता. त्याच्यासारखी कामगिरी याआधी फार कोणी केलेली नाही. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत ५० किंवा त्यापेक्षा अधिकच्या सरासरीने धावा करणारा तो जागतिक क्रिकेटमधील एकमेव फलंदाज आहे. कोहलीसारखा दुसरा खेळाडू नाही, असे अगदी स्टिव्ह स्मिथही म्हणाला. सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीनंतर आणि कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यावर असणार्‍या धोनीनंतर, इतर कोणत्याही खेळाडूला कोहलीइतक्या दबावाचा सामना करावा लागलेला नाही, असे विस्डेनकडून नमूद करण्यात आले.

दशकात सर्वोत्तम!

या दशकात विराट कोहलीने ८४ कसोटी सामन्यांत २७ शतकांसह ७२०२ धावा केल्या आहेत. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये ११,१२५ आणि टी-२० क्रिकेटमध्ये २,६३३ धावा त्याच्या नावे आहेत. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत ५० हून अधिकच्या सरासरीने धावा करणार्‍या कोहलीने आतापर्यंत ७० आंतरराष्ट्रीय शतके केली आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके लगावणार्‍या फलंदाजांच्या यादीत तो सचिन तेंडुलकर (१००) आणि रिकी पॉन्टिंग (७१) नंतर तिसर्‍या स्थानी आहे. सध्या जागतिक कसोटी आणि एकदिवसीय क्रमवारीतील फलंदाजांच्या तो अव्वल स्थानावर आहे.