घरक्रीडातिशीतल्या कोहलीला अधिक सरावाची गरज!

तिशीतल्या कोहलीला अधिक सरावाची गरज!

Subscribe

भारतीय कर्णधार विराट कोहलीला नुकत्याच झालेल्या न्यूझीलंड दौर्‍यात आपली छाप पाडता आली नाही. कोहलीला या दौर्‍याच्या ४ टी-२० सामन्यांत २६.२५ च्या सरासरीने १०५, ३ एकदिवसीय सामन्यांत २५ च्या सरासरीने ७५ आणि २ कसोटी सामन्यांच्या ४ डावांत ९.५० च्या सरासरीने अवघ्या ३८ धावा करता आल्या. कसोटी मालिकेत कायेल जेमिसन (९३), मोहम्मद शमी (४४) आणि ट्रेंट बोल्ट (३९) या गोलंदाजांनी कोहलीपेक्षा जास्त धावा केल्या.

यावरून त्याची कामगिरी किती निराशजनक होती हे लक्षात येते. कोहली सध्या जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखला जातो. त्यामुळे त्याला धावांसाठी इतके झुंजावे लागल्याचे अनेकांना आश्चर्य वाटले. मात्र, भारताचे माजी कर्णधार कपिल देव हे याला अपवाद होते. कोहलीला आता अधिक सरावाची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

तुम्ही जेव्हा वयाची तिशी पार करता, तेव्हा तुमच्या डोळ्यांवर नक्कीच परिणाम होतो. पूर्वी आतल्या दिशेने स्विंग (इन स्विंग) होणार्‍या चेंडूला फ्लिक करुन कोहली चौकार लगवायचा. परंतु, न्यूझीलंडमध्ये याच चेंडूवर तो दोन वेळा बाद झाला. त्यामुळे आता त्याने थोडे बदल केले पाहिजेत. मोठे खेळाडू जेव्हा आत येणार्‍या चेंडूवर त्रिफळाचित किंवा पायचीत होत असतात, तेव्हा त्यांना अधिक सराव करण्यास सांगितले पाहिजे.

चेंडू खेळण्यासाठी तुमच्याकडे असणारा वेळ कमी झाला आहे हे यावरुन कळते. तुम्हाला कळतही नाही आणि तुमची भक्कम बाजू कमकुवत होते. कोहलीला आता अधिक सरावाची गरज आहे. वयाचा तुमच्या दृष्टीवर परिणाम होतो. मग तुम्ही तंत्रावर अधिक लक्ष दिले पाहिजे, असे कपिल देव म्हणाले. तसेच त्यांनी पुढे सांगितले, कोहली हा उत्कृष्ट खेळाडू आहे. त्याला आयपीएलचा फायदा होईल. तो आपल्या खेळात आवश्यक बदल करुन पुन्हा फॉर्मात येईल याची मला खात्री आहे.

- Advertisement -

कोहलीबाबत इतकी चर्चा कशासाठी? -इंझमाम

पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हकने विराट कोहलीला पाठिंबा दर्शवला आहे. त्याच्या खराब फॉर्मबाबत इतकी चर्चा करण्याची गरज नाही, असे इंझमामला वाटते. कोहलीच्या तंत्राबाबत खूप काही बोलले जात आहे. त्याच्या फॉर्मबाबत चर्चा होत आहे आणि याचे मला आश्चर्य वाटते. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७० शतके केली आहेत. असे असताना तुम्ही त्याच्या तंत्रावर प्रश्न कसे उपस्थित करु शकता? तो खूप प्रयत्न करत आहे, पण त्याच्या धावा होत नाहीत. प्रत्येकच खेळाडूला या काळातून जावे लागते. कोहलीला अपयश आले हे खरे आहे, पण भारताच्या बाकीच्या खेळाडूंचे काय? त्यांच्याबाबत चर्चा का होत नाही? कोहलीला चिंता करण्याची गरज नाही. तो दमदार पुनरागमन करेल असा मला विश्वास आहे, असे इंझमाम म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -