कोहली भारतासाठी वेगळ्याच जिद्दीने खेळतो

- कुलदीप यादव

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला यंदाच्या आयपीएलमध्ये एकही सामना जिंकता आलेला नाही. त्यांनी आतापर्यंत ६ पैकी ६ सामने गमावले आहेत. त्यामुळे त्यांचा कर्णधार विराट कोहलीवरही जोरदार टीका होत आहे. काही लोकांच्या मते बंगळुरूच्या या पराभवांचा कोहलीच्या खेळावरही वाईट परिमाण होऊ शकेल आणि त्यामुळे आयपीएलनंतर होणार्‍या विश्वचषकात त्याला चांगले प्रदर्शन करणार नाही. पण, भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवला तसे होईल असे वाटत नाही. कोहली भारतासाठी वेगळ्याच जिद्दीने खेळतो, असे कुलदीप म्हणाला.

तो जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. त्याने याआधीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम मोडले आहेत. त्यामुळे बंगळुरूच्या पराभवांचा त्याच्या खेळावर परिणाम होईल असे मला वाटत नाही. तो भारतासाठी खेळताना वेगळ्याच जिद्दीने खेळतो. भारताचे सर्वच खेळाडू विश्वचषकात चांगले प्रदर्शन करण्यासाठी उत्सुक आहेत, असे कुलदीप म्हणाला.

तसेच बंगळुरूला चांगली कामगिरी करण्यात का अपयश येत आहे असे विचारले असता कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणार्‍या कुलदीपने सांगितले, त्यांच्या संघात कदाचित संतुलनाची कमी आहे. त्यामुळेच त्यांचा पराभव होत असावा. मात्र, संघाचा पराभव होत असला तरी कोहलीने फलंदाजीत चांगले प्रदर्शन केले आहे. तो जर असाच चांगला खेळत राहिला, तर ती भारतासाठीही चांगली गोष्ट असेल.