घरक्रीडाIND vs ENG : मालिका विजयांच्या हॅटट्रिकचे लक्ष्य! भारत-इंग्लंड निर्णायक वनडे सामना आज 

IND vs ENG : मालिका विजयांच्या हॅटट्रिकचे लक्ष्य! भारत-इंग्लंड निर्णायक वनडे सामना आज 

Subscribe

तिसऱ्या सामन्यात कुलदीपच्या जागी लेगस्पिनर युजवेंद्र चहलला संधी मिळू शकेल.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा व निर्णायक एकदिवसीय सामना रविवारी खेळला जाणार आहे. इंग्लंडने या भारत दौऱ्यात एकदिवसीय मालिकेआधी कसोटी आणि टी-२० मालिका खेळली. या दोन्ही मालिका जिंकण्यात भारताला यश आले होते. त्यामुळे आता तिसरा एकदिवसीय सामना जिंकत मालिका विजयांची हॅटट्रिक साजरी करण्याचे भारतीय संघाचे लक्ष्य असेल. या सामन्यात भारतीय संघात काही बदल होण्याची अपेक्षा आहे. विराट कोहलीच्या भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवत तीन सामन्यांच्या या मालिकेत आघाडी मिळवली होती. दुसऱ्या सामन्यात मात्र इंग्लंडने दमदार पुनरागमन केले. इंग्लंडने ३३७ धावा अवघ्या ४३.३ षटकांतच ६ विकेट राखून केल्या. जॉनी बेअरस्टो (१२४) आणि बेन स्टोक्स (९९) यांच्या फटकेबाजीपुढे भारतीय गोलंदाज निष्प्रभ ठरले.

कुलदीपचे स्थान धोक्यात 

या सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. आपला दुसरा सामना खेळणाऱ्या प्रसिध कृष्णाने २ विकेट घेतल्या, पण त्यासाठी ५८ धावा खर्ची केल्या. तसेच भुवनेश्वर कुमार (१० षटकांत ६३ धावा) आणि शार्दूल ठाकूर (७.३ षटकांत ५४ धावा) यांनीही निराशा केली. मात्र, इंग्लंडच्या फलंदाजांनी कुलदीप यादव (१० षटकांत ८४ धावा) आणि कृणाल पांड्या (६ षटकांत ७२ धावा) या फिरकीपटूंचा विशेष समाचार घेतला. कुलदीपला पहिल्या दोन्ही सामन्यांत विकेट घेता आली नाही. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात कुलदीपच्या जागी लेगस्पिनर युजवेंद्र चहलला संधी मिळू शकेल. फलंदाजीत मात्र बदल होणे अपेक्षित नाही.

- Advertisement -

फिरकीपटूच्या जागी वेगवान गोलंदाज?

पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये फिरकीपटूंच्या तुलनेत वेगवान गोलंदाजांना अधिक यश मिळत असल्याचे पाहायला मिळाले आहे. पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांत भारत आणि इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी मिळून २२ विकेट घेतल्या, तर फिरकीपटूंना केवळ २ विकेट घेता आल्या. भारतीय संघ पहिल्या दोन सामन्यांत कुलदीप यादव आणि कृणाल पांड्या या फिरकी जोडगोळीसह खेळला होता. मात्र, तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघ केवळ एका फिरकीपटूसह (युजवेंद्र चहल) खेळू शकेल. तसे झाल्यास टी. नटराजन किंवा मोहम्मद सिराजला अतिरिक्त वेगवान गोलंदाज म्हणून संधी मिळू शकेल.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -