घरक्रीडाकुंबळेची समिती घेणार टायब्रेकरबाबत निर्णय

कुंबळेची समिती घेणार टायब्रेकरबाबत निर्णय

Subscribe

भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळेच्या अध्यक्षतेखाली आयसीसीची क्रिकेट समिती एकदिवसीय क्रिकेटमधील टायब्रेकरबाबत निर्णय घेणार आहे. काही दिवसांपूर्वीच झालेल्या यजमान इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील विश्वचषकाच्या अंतिम लढतीत नियमित सामना आणि सुपर ओव्हरनंतर दोन्ही संघांमध्ये बरोबरी होती. मात्र, सामन्यात सर्वाधिक चौकार-षटकार लागवल्यामुळे इंग्लंडला विजेता घोषित करण्यात आले. त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले. मात्र, दोन्ही संघांमध्ये काहीही फरक नसताना इंग्लंडला अशाप्रकारे विजेता घोषित करण्यात आल्याने आयसीसीवर बरीच टीका झाली. आजी-माजी खेळाडूंनी आयसीसीकडे हा नियम बदल्याची मागणीही केली. त्यामुळे आता कुंबळेच्या अध्यक्षतेखाली आयसीसीची क्रिकेट समिती टायब्रेकरबाबत निर्णय घेणार असल्याचे आयसीसीचे महाव्यवस्थापक जेफ अ‍ॅलर्डाइस यांनी एका क्रिकेट संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

क्रिकेट समिती आपल्या पुढील बैठकीत विश्वचषकाच्या अंतिम सामन्यानंतर उदभवलेल्या समस्यांवर चर्चा करेल. आयसीसीच्या स्पर्धांमध्ये नियमित सामना बरोबरीत संपला, तर सामन्याचा निकाल लावण्यासाठी सुपर ओव्हरचा वापर २००९ पासून करण्यात येत आहे. तेव्हापासूनच सुपर ओव्हरनंतरही सामना बरोबरीत असल्यास सर्वाधिक चौकार-षटकार लागवणार्‍या संघालाच विजयी घोषित करण्यात येते. जवळपास सर्व टी-२० स्पर्धांमध्ये हाच नियम वापरला जातो. व्यवसायिक क्रिकेटमधील सर्व स्पर्धांमध्ये जे नियम वापरले जातात, तेच नियम आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वापरण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र, आता नियमात बदल करण्याबाबत आमची समिती विचार करेल, असे अ‍ॅलर्डाइस म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -