घरIPL 2020KXIP vs RCB : पंजाबचा पहिला विजय; विराट सेनेला ९७ धावांनी केलं...

KXIP vs RCB : पंजाबचा पहिला विजय; विराट सेनेला ९७ धावांनी केलं पराभूत

Subscribe

कर्णधार केएल राहुलच्या शतकाच्या मदतीने किंग्स इलेव्हन पंजाबने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ९७ धावांनी पराभव करत पहिला विजय नोंदवला. आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना कर्णधार केएल राहुलच्या शतकी खेळीच्या जोरावर २० षटकांत ३ गडी गमावून २०६ धावा केल्या. भल्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीच्या संघाने पंजाबच्या गोलंदाजांसमोर नांगी टाकली. आरसीबीचा संपूर्ण संघ १७ षटकांत १०९ धावांवर बाद झाला. त्यामुळे पंजाबला तब्बल ९७ धावांनी मोठा विजय मिळाला. ६९ चेंडूत नाबाद १३२ धावा ठोकणारा लोकेश राहुल सामनावीर ठरला.

प्रथम फलंदाजी करताना केएल राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी किंग्ज इलेव्हन पंजाबला चांगली सुरुवात दिली. दोघांनी पॉवरप्लेमध्ये ५० धावांची भागिदारी केली. मात्र सातव्या षटकात युजवेंद्र चहलने मयंक अग्रवालला त्रिफळाचीत केलं. मयंक २० चेंडूत २६ धावांवर बाद झाला. दुसरा धक्का निकोलस पुरणच्या रुपात बसला, त्याने १७ धावा केल्या. पंजाबला तिसरा धक्का ग्लेन मॅक्सवेलच्या रुपात बसला. यानंतर राहुलने संघाला सावरलं. केएल राहुलने आरसीबीविरुद्धच्या या सामन्यात पहिल्या ३६ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. या सामन्यात दोनदा जीवदान मिळालं. याचा फायदा घएत राहुलने शतक ठोकलं. राहुलने ६९ चेंडूत १३२ धावा करत नाबाद राहिला. त्यात १४ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता.

- Advertisement -

२०७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूचा संघ १०९ धावांवरच गारद झाला. सलामीला आलेला देवदत्त पडीकल एका धावेवर माघारी परतला. पाठोपाठ जोशुआ फिलीप (०), विराट कोहली (१) हे दोघेही स्वस्तात बाद झाले. त्यामुळे बंगळुरूची अवस्था ३ बाद ४ धावा अशी झाली होती. त्यानंतर फिंच आणि डीव्हिलियर्स जोडीने काही काळ तग धरला, मात्र, काही वेळातच फिंच २० धावांवर तर डीव्हिलियर्स २८ धावांवर माघारी परतला. वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक ३० धावांची खेळी केली पण त्यालाही फारसा प्रभाव पाडता आला नाही. अखेर १७ व्या षटकातच बंगळुरूचा संघ १०९ धावांत गारद झाला. रवि बिश्नोई आणि मुरूगन अश्विन या फिरकी जोडगोळीने ३-३ बळी टिपले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -