घरक्रीडारोहितचा शतकी चौकार

रोहितचा शतकी चौकार

Subscribe

सलामीवीर रोहित शर्माने केलेल्या शतकामुळे भारताने विश्वचषकातील बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात ५० षटकांत ९ बाद ३१४ अशी धावसंख्या उभारली. रोहितचे हे या विश्वचषकातील चौथे शतक होते. त्यामुळे त्याने एका विश्वचषकात सर्वाधिक शतके लागवण्याच्या कुमार संगकाराच्या विक्रमाशी बरोबरी केली. श्रीलंकेच्या संगकाराने मागील विश्वचषकात (२०१५) चार शतके लगावली होती. रोहितच्या या कामगिरीमुळे भारताने या स्पर्धेत चौथ्यांदा त्रिशतकी मजल मारली.या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताचे सलामीवीर रोहित आणि लोकेश राहुल यांनी अप्रतिम फलंदाजी करत पहिल्या विकेटसाठी १८० धावांची भागीदारी केली. या दोघांनी सुरुवातीपासून आक्रमक फलंदाजी केल्याने भारताने पहिल्या १० षटकांत ६९ धावा केल्या. रोहितने ४६, तर राहुलने ५७ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतक झाल्यानंतर रोहितने वेगवान गोलंदाजांवर हल्ला चढवत ९० चेंडूत आपले शतक पूर्ण केले. हे त्याचे एकदिवसीय क्रिकेटमधील २६ वे शतक होते. मात्र, दोन चेंडूंनंतर तो सौम्या सरकारच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने ९२ चेंडूत ७ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने १०४ धावा केल्या. राहुललाही यानंतर फार काळ खेळपट्टीवर टिकता आले नाही. त्याला ७७ धावांवर रुबेल हुसेनने यष्टीरक्षक मुशफिकूरकरवी झेलबाद केले.

कर्णधार कोहलीला या सामन्यात मोठी खेळी करण्यात अपयश आले. त्याला २६ धावांवर, तर दोन चेंडूनंतर खातेही न उघडलेल्या हार्दिक पांड्याला मुस्तफिझूरने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. युवा रिषभ पंत आणि अनुभवी महेंद्रसिंग धोनीने पाचव्या विकेटसाठी ४० धावांची भागीदारी केली. मात्र, ४८ धावांवर रिषभ बाद झाला. त्याने या धावा ४१ चेंडूत ६ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने केल्या. पुढे मुस्तफिझूरच्या चांगली गोलंदाजीमुळे धोनीला मोठे फटके मरता आले नाहीत. त्याला ३५ धावांवर मुस्तफिझूरनेच बाद केले. भारताला अखेरच्या १० षटकांत ६३ धावाच करता आल्या. भारताने ५० षटकांच्या अखेरीस ९ बाद ३१४ अशी धावसंख्या उभारली.

- Advertisement -

संक्षिप्त धावफलक

भारत : ५० षटकांत ९ बाद ३१४ (रोहित शर्मा १०४, लोकेश राहुल ७७, रिषभ पंत ४८, महेंद्रसिंग धोनी ३५; मुस्तफिझूर रहमान ५/५९, सौम्या सरकार १/३३) वि. बांगलादेश.

- Advertisement -

रोहितने या सामन्यात केलेले पराक्रम

एका विश्वचषकात सर्वाधिक शतके
रोहितने बांगलादेशविरुद्धच्या या सामन्यात १०४ धावांची खेळी केली. हे त्याचे या विश्वचषकातील चौथे शतक होते. त्यामुळे तो एका विश्वचषकात सर्वाधिक शतके करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. याआधी हा विक्रम सौरभ गांगुलीच्या नावे होता. त्याने २००३ सालच्या विश्वचषकात ३ शतके लगावली होती.

या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात केलेल्या शतकामुळे रोहित या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणार्‍या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचला. त्याने ७ सामन्यांमध्ये ९०.६६ च्या सरासरीने ५४४ धावा केल्या आहेत. या यादीत दुसर्‍या स्थानी असणार्‍या डेविड वॉर्नरने ८ सामन्यांत ५१६ धावा केल्या आहेत.

भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार
रोहितने आपल्या १०४ धावांच्या खेळीदरम्यान ५ षटकार लगावले. त्यामुळे त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय फलंदाजाने सर्वाधिक षटकार लागवण्याचा विक्रम आपल्या नावे केला. त्याने २१३ सामन्यांत २३० षटकार मारले आहेत, तर दुसर्‍या स्थानी असणार्‍या धोनीने आतापर्यंत २२८ षटकार लगावले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -