घरक्रीडा...अन ताहिरच्या फिरकीने केला बेअरस्टोचा घात !

…अन ताहिरच्या फिरकीने केला बेअरस्टोचा घात !

Subscribe

मला पहिल्या काही षटकांत फिरकीपटूसमोर फलंदाजी करायला आवडत नाही, असे विधान करताना आपण अनेक सलामीवीरांना पाहिले आहे. अगदी क्रिस गेलसारखा अफलातून सलामीवीरही सुरुवातीच्या षटकांत फिरकीपटूंविरुद्ध अडचणीत येताना पाहायला मिळते. २०११ च्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्स हे संघ आमने-सामने आले. या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणार्‍या गेलसमोर अंतिम सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनला गोलंदाजी देण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय मास्टरस्ट्रोक ठरला. अश्विनने पहिल्याच षटकात गेलला माघारी पाठवत चेन्नईचा विजय सुकर केला. असाच काहीसा मास्टरस्ट्रोक गुरुवारपासून सुरू झालेल्या विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात द.आफ्रिकेचा कर्णधार फॅफ डू प्लेसिसने खेळला. यजमान इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर फॅफने पहिले षटक टाकण्याची जबाबदारी अनुभवी लेगस्पिनर इम्रान ताहिरवर टाकली. ताहिरने आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थकी लावत दुसर्‍याच चेंडूवर फॉर्मात असलेल्या जॉनी बेअरस्टोला माघारी पाठवत इंग्लंडला पहिला झटका दिला.

विश्वचषकाच्या आधी काही दिवस झालेल्या आयपीएल स्पर्धेत ताहिर आणि बेअरस्टो या दोघांनीही अप्रतिम कामगिरी केली होती. चेन्नईकडून खेळणारा ताहिर या स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता, तर बेअरस्टोने अवघ्या १० सामन्यांतच ५६च्या सरासरीने ४४५ धावा केल्या होत्या. विश्वचषकाआधी इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात एकदिवसीय मालिका झाली, ज्यात बेअरस्टोने १ शतक आणि १ अर्धशतक केले होते. त्यामुळे विश्वचषक जिंकण्यासाठी प्रमुख दावेदार असलेल्या इंग्लंडला कमी धावांत रोखण्यासाठी बेअरस्टोला बाद करणे द.आफ्रिकेसाठी महत्त्वाचे होते. आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजांविरुद्ध अगदी सहजतेने फटकेबाजी करणारा बेअरस्टो फिरकीपटूंविरुद्ध काहीवेळा अडखळताना दिसला होता. हीच गोष्ट लक्षात ठेवत डू प्लेसिसने आपल्या सर्वात अनुभवी गोलंदाजाला पहिले षटक टाकण्याची जबाबदारी दिली. डू प्लेसिसचा ताहिरला पहिले षटक देण्याचा निर्णय खास होता, कारण लेगस्पिनर्सचे आपल्या गोलंदाजीवर तितकेसे नियंत्रण नसते, असे म्हटले जाते. मात्र, पॉवर-प्लेमध्ये आणि जेसन रॉय-बेअरस्टोसारखे ताबडतोड सलामीवीर खेळपट्टीवर असतानाही त्याने कागिसो रबाडापेक्षा ताहिरला गोलंदाजी दिली.

- Advertisement -

४० वर्षीय ताहिरचे हे षटक ऐतिहासिक होते. कोणत्याही क्रिकेट विश्वचषकाचे पहिले षटक टाकणारा तो पहिला फिरकीपटू ठरला. १९७५ साली झालेल्या पहिल्या विश्वचषकाचे पहिले षटक भारताच्या मदन लाल यांनी टाकले होते. याआधी १९९२ च्या विश्वचषकात न्यूझीलंडचा ऑफस्पिनर दीपक पटेलने बर्‍याच सामन्यांत पहिले षटक टाकले होते. त्याने या स्पर्धेच्या ९ सामन्यांत ८ विकेट घेतल्या होत्या आणि सर्वाधिक विकेट घेणार्‍या अव्वल २० गोलंदाजांच्या यादीत तो मुश्ताक अहमदनंतर केवळ दुसरा फिरकीपटू होता. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये पर्पल कॅप मिळवणारा ताहिर विश्वचषकाच्या यानंतरच्या सामन्यांतही पहिले षटक टाकतो का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -