सचिनप्रमाणेच आता ‘या’ खेळाडूला खेळताना पाहण्यासाठी उत्साही : सुनिल गावस्कर

यंदाच्या पर्वातील १४ सामन्यात उमरान मलिक याने २१ विकेट्स घेत गोलंदाजीच्या शर्यतीत म्हणजेच पर्पल कॅपच्या शर्यतीत चांगली कामगिरी केली.

भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील टी-२० मालिकेसाठी बीसीसीआयने (BCCI) अनेक युवा खेळाडूंना भारतीय संघात स्थान दिले आहे. यामध्ये यंदाच्या आयपीएमध्ये (IPL 2022) गोलंदाजीत उत्तम कामगिरी करणाऱ्या उमरान मलिक (Umran Malik) याला संधी देण्यात आली आहे. आयपीएलमध्ये त्याने केलेल्या गोलंदाजीची सर्व क्रिकेटपटूंकडून दखल घेतली जात आहे. अशातच आता भारताचे माजी कर्णधार सुनिल गावस्कर (Sunil Gawaskar) यांनीही मोठे विधान केले आहे. ‘तेंडुलकरनंतर पहिल्यांदाच कोणत्यातरी खेळाडूला खेळताना पाहण्यासाठी मी उत्साहीत आहे’, असे त्यांनी म्हटले. (like sachin tendulkar i excited to see umran malik playing in indian team says Sunil Gavaskar)

हेही वाचा – उमरान भारतीय संघासाठी दीर्घकाळ खेळेल; सौरव गांगुलीकडून मलिकचे कौतुक

सुनील गावस्कर यांनी स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत याबाबत भाष्य केले. यावेळी ते म्हणाले “याआधी मी शेवटचा सर्वाधिक उत्साहीत कोणत्या खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी होतो तो सचिन तेंडुलकर होता. त्यानंतर मी आता उमरान मलिक यासाठीही उत्साहीत आहे. माझ्या मते त्याला खेळण्याची संधी द्यायला हवी”, असे म्हटले.

हेही वाचा – विक्रम मोडण्यासाठी उमरानने आपली हाडे मोडू नयेत : शोएब अख्तर

यंदाच्या आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून गोलंदाजी करताना उमरान मलिकने फलंदाजांसमोर चेंडूचा भेदक मारा केला. गोलंदाजी करताना त्याने १५० किमी प्रतितासाने चेंडू टाकले. शिवाय, गुजरातविरुद्ध एका सामन्यात तब्बल ५ गडी बाद करत विशेष कामगिरी केली. त्यामुळे आयपीएलच्या इतिहासात प्रथमच सामना गमावलेल्या हैदराबाद संघाच्या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळाला.

हेही वाचा – IPL 2022 : उमरान मलिकने मोडला स्वत:चाच विक्रम; आयपीएल इतिहासातील दुसरा सर्वात वेगवान चेंडू फेकला

यंदाच्या पर्वातील १४ सामन्यात उमरान मलिक याने २१ विकेट्स घेत गोलंदाजीच्या शर्यतीत म्हणजेच पर्पल कॅपच्या शर्यतीत चांगली कामगिरी केली. याशिवाय आयपीएल 2022 मध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम गुजरात टायटन्सचा गोलंदाज लॉकी फर्ग्युसनच्या नावावर होता. त्याने चेन्नईविरुद्ध सामन्यात १५३.९ किमी प्रतितासाने चेंडू टाकला होता. परंतु, त्यानंतर उमरान मलिकनं १५४ किमी प्रतितास वेगानं चेंडू टाकत हा रेकॉर्ड तोडला. त्यानंतर ५ मे रोजी दिल्लीविरुद्ध तब्बल १५७ किमी प्रतितासाने चेंडू टाकत उमरानने स्वत:चाच रेकॉर्ड तोडला.


हेही वाचा – दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या तिसऱ्या मालिकेसाठी भारतीय संघात ‘हे’ दोन बदल महत्वाचे : संजय बांगर