क्रिकेट विश्वातली Jersey Controversy, अल्कोहोल प्रमोशन विरोधाचा इतिहास काय?

मोईनच्या आधीही बऱ्याच क्रिकेटपटूंनी मद्य उत्पादन कंपनीचा लोगो जर्सीवरून हटवण्याची मागणी केली आहे.

moeen ali, hashim amla
मोईन अली आणि हाशिम आमला

आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमाला ९ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाला आयपीएलच्या मागील मोसमात चांगली कामगिरी करण्यात अपयश आले होते. त्यामुळे यंदा चेन्नईचा संघ कशी कामगिरी करतो याकडे चाहत्यांचे लक्ष आहे. मात्र, ही स्पर्धा सुरु होण्याआधीच चेन्नईचा संघ आणि त्यांचा खेळाडू मोईन अली चर्चेचा विषय ठरले आहेत. मोईनने चेन्नई संघाच्या जर्सीवरील एका लोगोवर आक्षेप घेतल्याची माहिती माध्यमांपुढे आली होती. चेन्नईच्या जर्सीवर ‘एसएनजी १००००’ या मद्य उत्पादन कंपनीचा लोगो आहे. मोईन हा इस्लाम धर्माचे पालन करत असल्याने तो मद्यपान करत नाही किंवा प्रचारही करत नाही. त्यामुळे त्याने त्याच्या जर्सीवर हा लोगो न लावण्याची मागणी केली. एखाद्या खेळाडूने मद्य उत्पादन कंपनीचा लोगो जर्सीवरून हटवण्याची मागणी केल्याची ही पहिली वेळ नाही.

हाशिम आमला – दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू हाशिम आमलानेही मद्य उत्पादन कंपनीचा लोगो जर्सीवर लावण्यास नकार दिला होता. दक्षिण आफ्रिका संघाच्या जर्सीवर ‘कॅसल लॅगर’ या कंपनीचा लोगो होता. ही कंपनी दक्षिण आफ्रिकेत मद्य उत्पादन करण्यासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, आमलाने या कंपनीचा लोगो त्याच्या जर्सीवर लावण्यास नकार दिला आणि दक्षिण आफ्रिकन संघाने त्याची मागणी मान्यही केली.

राशिद खान – अफगाणिस्तानचा लेगस्पिनर राशिद खान जगभरातील विविध टी-२० स्पर्धांमध्ये खेळत असतो. तो ऑस्ट्रेलियातील टी-२० स्पर्धा बिग बॅश लीगमध्ये अ‍ॅडलेड स्ट्रायकर्सचे प्रतिनिधित्व करतो. २०१७-१८ मोसमात या संघाच्या जर्सीवर वेस्ट एंड या मद्य उत्पादन करणाऱ्या कंपनीचा लोगो होता. राशिदने मात्र या कंपनीचा लोगो त्याच्या जर्सीवर लावण्यास नकार दिला.

इमाद वसीम – पाकिस्तानचा डावखुरा फिरकीपटू इमाद वसीम २०१६ मध्ये कॅरेबियन प्रीमियर लीग टी-२० स्पर्धेत जमैका तालवाज संघाकडून खेळला. त्यावेळी या संघाच्या जर्सीवर अ‍ॅपलटन इस्टेट या रम उत्पादन कंपनीचा लोगो होता. मात्र, इमादने त्याच्या जर्सीवरून हा लोगो हटवण्याची मागणी केली.

अझर अली आणि फहीम अश्रफ – पाकिस्तानचे क्रिकेटपटू अझर अली, तसेच अष्टपैलू फहीम अश्रफ हे २०१९ मध्ये इंग्लंडमधील स्थानिक क्रिकेटमध्ये खेळले होते. अझर आणि फहीम यांनी अनुक्रमे समरसेट आणि नॉर्थहॅम्प्टनशायर या संघांचे प्रतिनिधित्व केले होते. त्यावेळी अझरने ट्रिब्यूट एल, तर फहीमने इंडिया पेल एल या मद्य उत्पादन कंपनींचे लोगो जर्सीवर लावण्यास नकार दिला होता.

मोईन अली – इंग्लंडचा अष्टपैलू मोईन अलीला २०२१ आयपीएल खेळाडू लिलावात चेन्नई सुपर किंग्स संघाने खरेदी केले. चेन्नईच्या जर्सीवर एसएनजी १०००० या मद्य उत्पादन कंपनीचा लोगो आहे. परंतु, मोईनने या कंपनीचा लोगो त्याच्या जर्सीवर लावण्यास नकार दिल्याची माहिती होती. तसेच चेन्नईच्या संघाने त्याची मागणी केल्याचेही म्हटले जात होते. मात्र, मोईनने अशी कोणतीही मागणी केली नसल्याचे चेन्नईच्या व्यवस्थापनाकडून नंतर स्पष्ट करण्यात आले.