घरक्रीडा‘त्या’ विवादाने मला अधिक नम्र बनवले !

‘त्या’ विवादाने मला अधिक नम्र बनवले !

Subscribe

‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात महिलांबाबत आक्षेपार्ह विधाने केल्यामुळे भारताचा क्रिकेटपटू लोकेश राहुल चांगलाच अडचणीत सापडला होता. सोशल मीडिया, प्रसारमाध्यमे त्याच्यावर टीका करत होती, तर बीसीसीआयने त्याच्यावर काही काळासाठी बंदीही घातली होती. या घटनेतून आपल्याला चांगलाच धडा मिळाला आहे आणि या विवादामुळे आपण अधिक नम्र झालो आहे, असे विधान राहुलने केले.

माझ्यासाठी हा वेळ खूपच कठीण होता. एक खेळाडू म्हणून, एक माणूस म्हणून तुम्हाला कधीतरी कठीण काळ पहावाच लागतो आणि हा माझ्यासाठी तोच काळ होता. मात्र, या काळात मला खूप काही शिकायला मिळाले. मला माझ्याविषयी, माझ्या खेळाविषयी विचार करण्यासाठी वेळ मिळाला, असे राहुल ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसर्‍या टी-२० सामन्यानंतर म्हणाला. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका ०-२ अशी गमावली असली तरी या मालिकेत राहुलने ५० आणि ४७ धावा करत चांगले पुनरागमन केले ही भारतासाठी सकारात्मक गोष्ट होती.

- Advertisement -

राहुलने ‘कॉफी विथ करण’मधील विवादाविषयीही दुसर्‍या सामन्यानंतर चर्चा केली. तो म्हणाला, त्या विवादामुळे मी अधिक नम्र झालो आहे. मला माझ्या देशासाठी खेळण्याची संधी मिळते, या गोष्टीचा मी अधिक आदर करायला लागलो आहे. प्रत्येक लहान मुलाचे आपल्या देशासाठी खेळण्याचे स्वप्न असते आणि माझेही तेच होते. आता मला जी संधी मिळत आहे, त्याचा अधिकाधिक वापर करायचा आणि फक्त क्रिकेटवर लक्ष केंद्रित करायचा मी प्रयत्न करत आहे.

त्या विवादानंतर राहुलवर बंदी घालण्यात आली होती. ती बंदी उठवल्यानंतर त्याची भारत ‘अ’ संघामध्ये निवड झाली. त्यावेळी त्याला भारत ‘अ’चा प्रशिक्षक आणि भारताचा महान खेळाडू राहुल द्रविडसोबत वेळ घालवण्याची संधी मिळाली. त्याच्यासोबत वेळ घालवल्याचा मला फायदा झाला असे राहुल म्हणाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून मी थोडा वेळ बाहेर होतो, त्यामुळे भारतात परतल्यानंतर मी नेमका कुठे चुकतोय याकडे लक्ष देण्यासाठी मला वेळ मिळाला. सुदैवाने मला भारत ‘अ’ संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. या सामन्यांमध्ये तुमच्यावर तितकासा दबाव नसतो. त्यामुळे फलंदाज म्हणून तुम्ही स्वतःच्या तंत्रावर लक्ष केंद्रित करू शकता. याचवेळी मला राहुल द्रविडसोबतही चर्चा करण्याची संधी मिळाली. त्याच्याबरोबर वेळ घालवल्याचा मला खूप फायदा झाला आहे, असे राहुलने सांगितले.

- Advertisement -

क्रमवारीत राहुलला बढती

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत चांगली कामगिरी करणार्‍या लोकेश राहुलच्या आयसीसी क्रमवारीत सुधारणा झाली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेआधी दहाव्या स्थानावर असलेला राहुल, दोन सामन्यांनंतर सहाव्या स्थानावर पोहचला आहे. राहुलने विशाखापट्टणम येथे झालेल्या पहिल्या सामन्यात ३६ चेंडूत ५० आणि बंगळुरु येथे झालेल्या दुसर्‍या सामन्यात २६ चेंडूत ४७ धावा केल्या होत्या. या खेळीचा फायदा राहुलला मिळाला आहे. अव्वल १० फलंदाजांमध्ये तो एकमेव भारतीय आहे. गोलंदाजांमध्ये कुलदीप यादवचा अपवाद वगळता भारताच्या एकाही गोलंदाजाला अव्वल १० जणांमध्ये स्थान मिळवता आलेले नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -