Dhoni : धोनीचा एक नंबरी निर्णय, BCCI च्या सचिवांकडून दुजोरा..!

M S dhoni as mentor

भारतीय संघाचा माजी कर्णधार एम.एस.धोनी आगामी विश्वकपात भारतीय संघाचा मेंटॉर म्हणून काम करणार असल्याची माहिती बीसीसीआयने अगोदरच दिली होती. दरम्यान धोनी या मालिकेसाठी बोर्डाकडून कोणतेही शुल्क आकारणार नसल्याची माहिती भारतीय क्रिकेट बोर्डोचे (BCCI) सचिव जय शाह यांनी दिली आहे. शाह यांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले की, एमएस धोनी टी ट्वेंटी विश्वचषकासाठी भारतीय संघाचा मेंटॉर म्हणून त्याच्या सेवेसाठी कोणतेही मानधन घेणार नाही.

ओमान येथे यूएईच्या धरतीवर येत्या १७ ऑक्टोबरपासून टी ट्वेंटी विश्वचषकाची सुरूवात होणार आहे. भारतीय संघात धोनी मेटॉर म्हणून संघासोबत असणार आहे. संघातील खेळाडूंना धोनी मार्गदर्शन करेल. तसेच ड्रेसिंग रूममधून खेळाडूंना प्रोत्साहन देताना दिसेल. धोनीच्या अनुभवाचा फायदा नक्कीच भारतीय संघाला होईल, असे क्रिकेट प्रेमींचेही म्हणणे आहे. मेंटॉरसाठीची धोनीची नियुक्ती सकारात्मक मानली जात आहे. महेंद्रसिंह धोनी हा १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे.

धोनीचा अनुभवाचा संघाला होणार फायदा !

धोनी भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे, त्याच्या नेतृत्वात भारताने कित्येक मालिका जिंकल्या आहेत साहजिकच धोनीच्या अनुभवाचा फायदा भारतीय संघाला होईल. भारताने २०१७ च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत, २०१९च्या एकदिवसीय विश्वचषकाची उपांत्य फेरी आणि या वर्षी खेळल्या गेलेल्या विश्व कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. मात्र, सर्व बाद फेरीच्या सामन्यांमध्ये संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. या वेळी धोनीचा अनुभव संघासाठी आणि कर्णधार कोहलीला बाद फेरीसारख्या महत्त्वाच्या सामन्यांमध्ये खूप उपयुक्त ठरू शकतो.

२४ ऑक्टोबरला ‘महामुकाबला “

टी ट्वेंटी विश्वकपातील पहिला सामना भारतीय संघ २४ ऑक्टोबरला आपला कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान विरूध्द खेळणार आहे. हा सामना दुबईच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. यानंतर 31ऑक्टोबर रोजी न्यूझीलँड आणि ३ नोव्हेंबरला अफगाणिस्तानविरुद्ध सामना असणार आहे. तर ५ नोव्हेंबरला बी १ आणि ८ नोव्हेंबरला ए २ सोबत सामना असेल.