मुंबई : रणजी ट्रॉफीचे सामने सुरू असून या रणजी ट्रॉफीवरून भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. मात्र असं असलं तरी एका खेळाडूवर BCCIकडून एका सामन्याची बंदी घातण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रणजी ट्रॉफी चर्चेत आली आहे. महाराष्ट्राचा फलंदाज अंकित बावणे याला BCCI कडून एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. नाशिकमधील गोल्फ क्लब मैदानावर महाराष्ट्र आणि बडोदा यांच्यात होणाऱ्या रणजी ट्रॉफी २०२४/२५ हंगामाच्या सहाव्या फेरीच्या आधी बीसीसीआयने ही घोषणा केली. (Maharashtra batter Ankit Bawne facing one match Ban By BCCI After clashed with umpires)
गतवर्षी नोव्हेंबरमध्ये MCA मैदानावर महाराष्ट्राच्या सर्व्हिसेस विरुद्ध ग्रुप अ सामन्यादरम्यान व्हाईट-बॉल स्पर्धा सुरू होण्यापूर्वी ही घटना घडली होती. अमित शुक्लाच्या गोलंदाजीवर सर्व्हिसेसच्या शुभम रोहिलाने बावणेला स्लिपमध्ये झेल दिला, पण तो पंचांच्या निर्णयावर नाराज होता. कारण त्याला वाटले की तो बाद नव्हता. डीआरएस उपलब्ध नसल्याने निर्णयाला आव्हान देता येत नसल्याने त्याने सुमारे 15 मिनिटे मैदान सोडण्यास नकार दिला. त्यानंतर सामनाधिकारी अमित शर्मा आणि महाराष्ट्राचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांच्या हस्तक्षेपानंतर सामना पुन्हा सुरू झाला.
दरम्यान, रणजी ट्रॉफीवेळी पंचांना विरोध करत त्यांच्याशी वाद घातल्याने बीसीसीआयने अंकित बावणे याला एका सामन्याची बंद घातली. याबाबत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून अधिकृत माहिती देण्यात आली. त्यानुसार, रणजी ट्रॉफी खेळाडू अंकित बावणेला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. अंकित बावणे बडोद्याविरुद्ध सुरू असलेल्या रणजी ट्रॉफी सामन्याच्या निवडीसाठी उपलब्ध नाही. मात्र पुढील सामन्यासाठी तो उपलब्ध असेल. महाराष्ट्र संघाच्या यशाची जबाबदारी त्याच्यावर असेल. आम्ही संघात योगदान देत राहू. आम्ही बीसीसीआयच्या निर्णयांचा आदर करतो आणि क्रिकेटच्या खेळात शिस्त आणि खिलाडूवृत्ती राखण्यासाठी वचनबद्ध आहोत. संघ सध्याच्या खेळात सर्वोत्तम कामगिरी करण्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करत आहे आणि आम्ही सकारात्मक दृष्टिकोनाने आगामी सामन्यांची वाट पाहेन”, असे MCA कडून स्पष्ट करण्यात आले.