Friday, April 16, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा बाला रफीक शेख यंदाचा महाराष्ट्र केसरी; अभिजित कटके धोबीपछाड

बाला रफीक शेख यंदाचा महाराष्ट्र केसरी; अभिजित कटके धोबीपछाड

गतविजेत्या अभिजीत कटकेचा केला पराभव

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्राची मानाची समजली जाणारी महाराष्ट्र केसरी कुस्ती २०१८ चा मानकरी ठरला आहे बाला रफीक शेख.. आज अटीतटीच्या झालेल्या सामन्यात बाला शेखने गतविजेत्या अभिजीत कटकेचा ११-३ पराभव केला आहे. बुलडाण्याचा बाला रफीक शेख आणि पुण्याच्या अभिजीत कटके यांच्यात आज महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना रंगला. जालना येथे सुरु असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार रंगला होता. अभिजीत कटके याने सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत धडकी मारण्याचा विक्रम केला होता. गेल्यावर्षी अभिजीत कटके याने महाराष्ट्र केसरीची गदा उचलली होती.

- Advertisement -

सुरुवातीपासूनच अभिजीत आणि बाला शेखमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळाली. अटीतटीच्या सामन्यात बालाने आघाडी मिळवल्यानंतर अभिजीतचा टिकाव लागू शकला नाही. बालाने टाकलेले डाव अभिजीतला वेळेत उलटवता आले नाही आणि बालाने अखेर ११-३ ने अभिजीतवर दणदणीत विजय मिळवला.

- Advertisement -

राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याहस्ते बाला रफीक शेखला मानाची चांदीची गदा देण्यात आली. यावेळी बालाच्या कुटुंबियांना आनंदाश्रू अनावर झालेले पाहायला मिळाले.

 मातीतील मल्ल अशी ओळख असलेल्या बुलढाण्याच्या बाला रफिक शेखने गतविजेत्या अभिजीत कटकेवर मात करत महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावला. बाला रफिक शेखने अभिजितवर ११-३ अशी मात करत मानाच्या गदेवर आपले नाव कोरले. २६ वर्षीय बालाने २२ वर्षीय अभिजितला अस्मान दाखविले. या विजयानंतर मातीतील वाघाने मॅटच्या सिंहाला पराभूत केल्याची भावना कुस्ती विश्वामध्ये व्यक्त करण्यात येत होती.

पुण्याच्या गणेश पेठेतील शिवरामदादा तालमीचा अभिजीत कटके हा पैलवान आहे तर बाला रफिक पुण्याच्याच हनुमान आखाड्याचा पैलवान आहे. अभिजीतने येथे सुरू असलेल्या प्रतिष्ठित अशा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सलग तिसर्‍यांदा अंतिम फेरीत धडक मारली होती. परंतु,त्याच्या विजयाची घोडदौड बालाने खंडीत केली.

अभिजीत कटकेने सामन्याच्या पहिल्या मिनिटात जोरदार आक्रमण करत बालाला मॅटच्या बाहेर पाडले. परंतु,त्यानंतरही बाला रफिक शेखने जोरदार पुनरागमन केले. बाला रफिकने जोरदार आक्रमण करत दोन गुण कमावले. त्यामुळे पहिल्या काही मिनिटांमध्ये बाला रफिक शेखने अभिजितवर २-१ अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर पुन्हा आक्रमण करत बाला रफिक शेखने ३-१ अशी आघाडी मिळवली.त्यानंतर बालाने अभिजीतवर शेवटपर्यंत वर्चस्व निर्माण करत हा सामना आरामात जिंकला.बालाने हा सामना जिंकल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले होते. आपले गुरू आणि मार्गदर्शकांच्या आशिर्वादामुळेच हे यश संपादन करता आले,अशी प्रतिक्रिया बाला रफिक शेखने दिली.

या वयातही दोघांनीही भारताच्या कुस्तीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण होती.त्यामुळे या कुस्तीकडे सर्वच कुस्तीप्रेमींचे लक्ष लागून राहिले होते. अभिजीत कटके हा मॅटवरचा मातब्बर पैलवान बनला आहे. तो सलग तिसर्‍यांदा मॅट विभागाची फायनल जिंकून, महाराष्ट्र केसरी किताबाच्या कुस्तीसाठी पात्र ठरला होता. तर बाला रफिकने मैदानी कुस्तीचा हीरो म्हणून महाराष्ट्रात आपला ठसा उमटवला आहे. त्याने माती विभागाची फायनल जिंकून, पहिल्यांदाच महाराष्ट्र केसरीसाठी लढण्याचा मान मिळवला आणि या संधीचे त्याने सोनेही करत गदा उचलली.

- Advertisement -