महिंद्रा, शिवशक्तीला विजेतेपद

मुंबई महापौर चषक कबड्डी

महिंद्राच्या पुरुष संघाने मध्य रेल्वेच्या पुरुष संघाचा पराभव करत ’मुंबई महापौर चषक’ कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. ही स्पर्धा जिंकल्यामुळे त्यांना चषक आणि रोख रु. एक लाख मिळाले. महिलांच्या अंतिम सामन्यात शिवशक्तीने राजमाता जिजाऊला पराभूत केले. पुरुषांमध्ये महिंद्राचा अनंत पाटील, तर महिलांमध्ये शिवशक्तीची आंतरराष्ट्रीय खेळाडू सोनाली शिंगटेला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला.

ना. म. जोशी मार्ग येथील श्रमिक जिमखान्यात झालेल्या या स्पर्धेतील पुरुषांच्या अंतिम सामन्यात महिंद्राने मध्य रेल्वेचा प्रतिकार ३८-३२ असा परतवून लावला. अनंत पाटीलने बोनस, तर ओमकार जाधवने गुण मिळवत महिंद्राला झोकात सुरुवात करून दिली. सामन्याच्या १० व्या मिनिटाला रेल्वेवर लोण देत महिंद्राने १२-०७ अशी आघाडी घेतली, तर २ मिनिटांनंतर पुन्हा दुसरा लोण देत महिंद्राने आपली आघाडी २१-०७ अशी वाढवली. मध्यांतराला महिंद्राकडे २५-१२ अशी आघाडी होती.

मध्यांतरानंतर रेल्वेने आपल्या खेळाची गती वाढवत १३ व्या मिनिटाला लोण देत ही आघाडी २३-३३ अशी कमी केली. पुन्हा जोरदार आक्रमण करत शेवटच्या काही मिनिटांत रेल्वेने महिंद्राची आघाडी ३०-३४ अशी अवघ्या ४ गुणांवर आणली. महिंद्राच्या शेवटच्या चढाईला सुरुवात होण्यापूर्वी रेल्वेला एक विशेष गुण मिळाल्यामुळे महिंद्राची आघाडी ३ गुणांवर आली. महिंद्राचा ऋतुराज कोरवी हा एकटा मैदानात होता. त्यामुळे चढाई करण्याची जबाबदारी त्याच्यावरच होती. त्याची पकड झाली असती तर महिंद्रावर लोण होऊन हा सामना ३५-३५ असा बरोबरीत संपला असता. मात्र, त्याने अखेरच्या चढाईत रेल्वेचे ३ गडी टिपत महिंद्राला महापौर चषक मिळवून दिला. महिंद्राच्या अनंत पाटीलने २६ चढायांत ४ बोनस गुणांसह एकूण १० गुणांची कमाई केली. ऋतुराज कोरवीने अवघ्या ६ चढायांत १ बोनस गुणासह एकूण ९ गुण मिळवले. तसेच त्याने ४ पकडीही करत महिंद्राच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. या स्पर्धेतील उत्कृष्ट चढाईचा खेळाडू ठरला तो देना बँकेचा नितीन देशमुख आणि उत्कृष्ट पकडीचा खेळाडू ठरला तो मध्य रेल्वेचा परेश चव्हाण.

महिलांच्या अंतिम सामन्यात शिवशक्तीने राजमाता जिजाऊवर ३२-१७ अशी मात केली. पहिल्याच चढाईत शिवशक्तीच्या पौर्णिमा जेधेने स्नेहल शिंदेंची पकड केली. मात्र, यानंतर दोन्ही संघांनी सावध खेळ केला. त्यामुळे मध्यांतराला सामन्यात १०-१० अशी बरोबरी होती. मध्यांतरानंतर मात्र शिवशक्तीने ६ व्या मिनिटाला राजमातावर पहिला लोण देत १९-१२ अशी आघाडी घेतली. त्यानंतर पुन्हा एक लोण देत शिवशक्तीने आपली आघाडी २८-१६ अशी भक्कम केली. शेवटी त्यांनी ३२-१७ असा हा सामना जिंकला. शिवशक्तीच्या सोनाली शिंगटेने १६ चढाया करत २ बोनस आणि ७ गडी बाद करत ९ गुण मिळवले. तिला रेखा सावंत आणि पौर्णिमा जेधेने ६-६ यशस्वी पकडी करत चांगली साथ दिली. राजमाता जिजाऊच्या सायली केरीपाळे आणि अंकिता जगताप यांना स्पर्धेतील अनुक्रमे चढाई आणि पकडीचे सर्वोत्तम खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले.