भारताचे आव्हान संपुष्टात

सिंधू, सायना उपांत्यपूर्व फेरीत पराभूत

भारताच्या स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांना मलेशिया मास्टर्स स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. सहाव्या सीडेड सिंधूला चिनी तैपेईच्या ताई झू यिंगने, तर सायनाला स्पेनच्या ऑलिम्पिक पदकविजेत्या कॅरोलिना मरीनने पराभूत केले. त्यांच्या पराभवामुळे भारताचेही या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. पुरुषांमध्ये भारताच्या एकाही खेळाडूला उपांत्यपूर्व फेरी गाठता आली नव्हती.

महिला एकेरीतील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात विश्वविजेत्या सिंधूवर अव्वल सीडेड ताई झू यिंगने १६-२१, १६-२१ अशी मात केली. यिंगविरुद्धचा सामना गमावण्याची ही सिंधूची सलग दुसरी वेळ होती. या सामन्यात पहिल्या गेमच्या सुरुवातीला दोन्ही खेळाडूंनी झुंजार खेळ केला. त्यामुळे या गेममध्ये ७-७ अशी बरोबरी होती. मात्र, यानंतर यिंगने अधिक आक्रमक खेळ करत पहिला गेम अवघ्या १७ मिनिटांत २१-१६ असा जिंकला. दुसर्‍या गेममध्ये मात्र यिंगने सुरुवातीपासूनच वर्चस्व प्रस्थापित करत ११-४ अशी आघाडी घेतली. मध्यंतरानंतर सिंधूने आपल्या खेळात सुधारणा केली, पण तिचे प्रयत्न अपुरेच पडले. यिंगने हा गेम २१-१६ असा जिंकत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

दुसरीकडे सायना नेहवालचा स्पेनच्या कॅरोलिना मरीनने ८-२१, ७-२१ असा सहज पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली. या सामन्याआधी सायना आणि मरीनमध्ये १२ सामने झाले होते आणि दोन्ही खेळाडूंनी ६-६ सामने जिंकले होते. मात्र, या सामन्यात सायनाला चांगला खेळ करता आला नाही. या गेमच्या पहिल्या गेममध्ये मरीनने १०-६ अशी आघाडी मिळवली. त्यानंतर तिने अधिकच उत्कृष्ट खेळ करत सामना जिंकला. दुसर्‍या गेममध्येही मरीनने दमदार खेळ सुरु ठेवत सायनाला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला.