घरक्रीडासायना नेहवाल, सिंधूची उपांत्यपूर्व फेरीत धडक

सायना नेहवाल, सिंधूची उपांत्यपूर्व फेरीत धडक

Subscribe

मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन

सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू या भारताच्या स्टार बॅडमिंटनपटूंनी मलेशिया मास्टर्स स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. पुरुषांमध्ये समीर वर्मा आणि एच. एस. प्रणॉय यांना मात्र पराभवाचा सामना करावा लागला. पुरुष एकेरीच्या दुसर्‍या फेरीत समीरला मलेशियाच्या ली झी जिआने १९-२१, २०-२२ असे पराभूत केले. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असणार्‍या जपानच्या केंटो मोमोटाकडून २१-१४, २१-१६ असे पराभूत झाल्यामुळे प्रणॉयवर स्पर्धेबाहेर होण्याची नामुष्की ओढवली.

महिला एकेरीत सायनाने दक्षिण कोरियाच्या एन से यंगवर २५-२३, २१-१२ अशी मात करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. ३८ मिनिटे चाललेल्या या सामन्याचा पहिला गेम फारच चुरशीचा झाला. या गेमच्या सुरुवातीला यंगने ६-३ अशी आघाडी घेतल्यानंतर सायनाने सलग चार गुण कमावत ७-६ अशी आघाडी मिळवली. तिने पुढेही चांगला खेळ सुरु ठेवत १५-१३ अशी आघाडी राखली. मात्र, १७ वर्षीय यंगने दमदार पुनरागमन केले आणि सलग पाच घेत १८-१५ अशी आघाडी मिळवली. परंतु, यानंतर सायनाने आपला अनुभव पणाला लावत हा गेम २५-२३ असा आपल्या खिशात टाकला. दुसर्‍या गेममध्ये मात्र यंगला आपला सर्वोत्तम खेळ करण्यात अपयश आले. त्यामुळे सायनाने हा गेम २१-१२ असा नऊ गुणांच्या फरकाने जिंकत हा सामना जिंकला. तिचा उपांत्यपूर्व फेरीत स्पेनच्या कॅरोलिना मरीनशी होईल.

- Advertisement -

सहाव्या सीडेड सिंधूने दुसर्‍या फेरीच्या सामन्यात जपानच्या अया ओहोरीचा २१-१०, २१-१५ असा सहज पराभव केला. हा सिंधूचा ओहोरीवर सलग नववा विजय होता. आता उपांत्यपूर्व फेरीत सिंधूसमोर चिनी तैपेईच्या ताई झू यिंगचे आव्हान असेल. सिंधू आणि यिंगमध्ये याआधी १६ सामने झाले आहेत. सिंधूला ५, तर यिंगला ११ सामने जिंकण्यात यश आले आहे. त्यामुळे या सामन्यातही यिंगचे पारडे जड मानले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -