Monday, February 22, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा EPL : मँचेस्टर सिटीची विजयाची मालिका सुरूच; आर्सनलवर केली मात

EPL : मँचेस्टर सिटीची विजयाची मालिका सुरूच; आर्सनलवर केली मात

मँचेस्टर सिटीचा हा सर्व स्पर्धांमधील सलग १८ वा विजय ठरला.

Related Story

- Advertisement -

मँचेस्टर सिटीला आपली विजयाची मालिका सुरु ठेवण्यात यश आले. त्यांनी इंग्लिश प्रीमियर लीगच्या सामन्यात आर्सनलचा १-० असा पराभव केला. मँचेस्टर सिटीचा हा सर्व स्पर्धांमधील सलग १८ वा विजय ठरला. तसेच प्रीमियर लीगमध्ये मँचेस्टर सिटीचा हा २५ सामन्यांत १८ वा विजय ठरला. त्यामुळे सिटीचा संघ ५९ गुणांसह अव्वल स्थानावर असून त्यांच्यात आणि दुसऱ्या स्थानावरील मँचेस्टर युनायटेडमध्ये १० गुणांचा फरक आहे. युनायटेडने न्यूकॅसलला ३-१ असे पराभूत करत आपला चांगला फॉर्म कायम राखला. मँचेस्टर युनायटेडच्या मार्कस रॅशफोर्ड, डॅनियल जेम्स आणि ब्रुनो फर्नांडेसने या सामन्यात गोल केले.

दुसऱ्याच मिनिटाला गोल

मँचेस्टर सिटीने आर्सनलविरुद्ध सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. दुसऱ्याच मिनिटाला रहीम स्टर्लिंगने गोल करत मँचेस्टर सिटीला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतरही आर्सनलला त्यांचा खेळ उंचावता आला नाही. त्यामुळे सिटीने मध्यंतराला १-० अशी आघाडी राखली. उत्तरार्धात आर्सनलचा संघ पुनरागमन करेल अशी अपेक्षा होती. परंतु, मँचेस्टर सिटीचा भक्कम बचाव भेदण्यात आर्सनलला अपयश आले. अखेर मँचेस्टर सिटीने हा सामना १-० असा जिंकला.

वेस्ट हॅम विजयी

- Advertisement -

टॉटनहॅमला मात्र पराभवाचा सामना करावा लागला. त्यांना वेस्ट हॅमने २-१ असे पराभूत केले. या सामन्यात वेस्ट हॅमकडून पूर्वार्धात मिकेल अँटोनियो आणि उत्तरार्धात जेसी लिंगार्ड यांनी गोल केले. टॉटनहॅमचा एकमेव गोल ल्युकास मोराने केला. लेस्टर सिटीने प्रीमियर लीगमध्ये अ‍ॅश्टन विलावर २-१ अशी मात केली. लेस्टरकडून जेम्स मॅडिसन आणि हार्वी बार्न्सने या सामन्यात गोल केले.

- Advertisement -