Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा IND vs AUS : मार्नस लबूशेनचे दमदार शतक; ऑस्ट्रेलिया ५ बाद २७४ 

IND vs AUS : मार्नस लबूशेनचे दमदार शतक; ऑस्ट्रेलिया ५ बाद २७४ 

पहिल्या दिवशी कसोटीत पदार्पण करणाऱ्या नटराजनने दोन, तर सुंदरने एक विकेट घेतली.    

Related Story

- Advertisement -

मार्नस लबूशेनच्या दमदार शतकाच्या जोरावर भारताविरुद्ध चौथ्या आणि निर्णायक कसोटीची ऑस्ट्रेलियाने चांगली सुरुवात केली. पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाची ५ बाद २७४ अशी धावसंख्या होती. जसप्रीत बुमराह आणि अश्विन या भारताच्या प्रमुख गोलंदाजांना दुखापतीमुळे या कसोटीत खेळता आले नाही. त्यांच्या जागी वेगवान गोलंदाज टी. नटराजन आणि ऑफस्पिनर वॉशिंग्टन सुंदर यांना कसोटीत पदार्पणाची संधी मिळाली. या संधीचा फायदा घेत पहिल्या दिवशी नटराजनने दोन, तर सुंदरने एक विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाकडून लबूशेनने अप्रतिम फलंदाजी करत २०४ चेंडूत १०८ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत ९ चौकारांचा समावेश होता. त्याचे हे कसोटी क्रिकेटमधील पाचवे शतक ठरले.

लबूशेन-स्मिथने सावरला डाव 

ब्रिस्बन येथे होत असलेल्या या कसोटीत ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. ऑस्ट्रेलियाच्या डावाची अडखळती सुरुवात झाली. मोहम्मद सिराजने पहिल्याच षटकात डेविड वॉर्नरला (१) माघारी पाठवले. तर मालिकेतील पहिला सामना खेळणारा मार्कस हॅरिसही फार काळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. त्याला ५ धावांवर शार्दूल ठाकूरने बाद केले. मात्र, मार्नस लबूशेन आणि स्टिव्ह स्मिथ या भरवशाच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी २६ षटकांत ७० धावांची भागीदारी रचली. अखेर सुंदरने स्मिथला ३६ धावांवर बाद करत ही जोडी फोडली.

अर्धशतकानंतर आक्रमक फलंदाजी  

- Advertisement -

लबूशेनने मात्र चांगला खेळ सुरु ठेवत १४५ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतक झाल्यावर त्याने आक्रमक शैलीत खेळण्यास सुरुवात केली. पुढील ५० चेंडूत ५० धावा करत लबूशेनने कसोटी कारकिर्दीतील पाचवे शतक झळकावले. तसेच त्याने मॅथ्यू वेडच्या साथीने चौथ्या विकेटसाठी ११३ धावांची भागीदारी रचली. परंतु, नटराजनच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात वेड (४५) आणि लबूशेन (१०८) बाद झाले. पुढे कॅमरुन ग्रीन (नाबाद २८) आणि टीम पेनने (नाबाद ३८) संयमाने फलंदाजी केली. त्यामुळे दिवसअखेर ऑस्ट्रेलियाची ५ बाद २७४ अशी धावसंख्या होती.

- Advertisement -