Thursday, April 15, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा NZ vs AUS : न्यूझीलंडचा सलग दुसरा विजय, ऑस्ट्रेलियावर चार धावांनी मात 

NZ vs AUS : न्यूझीलंडचा सलग दुसरा विजय, ऑस्ट्रेलियावर चार धावांनी मात 

गप्टिलने ५० चेंडूत ६ चौकार आणि ८ षटकारांच्या ९७ धावांची खेळी केली.

Related Story

- Advertisement -

अनुभवी सलामीवीर मार्टिन गप्टिलच्या उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने दुसऱ्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियावर ४ धावांनी विजय मिळवला. दोन्ही संघांनी मिळून या सामन्यात ४३४ धावा चोपून काढल्या, ज्यात तब्बल ३० षटकारांचा समावेश होता. न्यूझीलंडने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ७ बाद २१९ अशी धावसंख्या उभारली. याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ २० षटकांत ८ बाद २१५ धावा करू शकला. त्यामुळे न्यूझीलंडने हा चुरशीचा सामना अवघ्या ४ धावांनी जिंकला. न्यूझीलंडने हा सामना जिंकत पाच सामन्यांच्या या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. न्यूझीलंडच्या गप्टिलने ५० चेंडूत ६ चौकार आणि ८ षटकारांच्या ९७ धावांची खेळी केली.

गप्टिलचे शतक हुकले

- Advertisement -

या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अ‍ॅरॉन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. न्यूझीलंडचा सलामीवीर टीम सायफर्ट (३) लवकर बाद झाला. परंतु, गप्टिल आणि कर्णधार केन विल्यमसन यांनी दुसऱ्या विकेटसाठी १३१ धावांची भागीदारी रचत न्यूझीलंडचा डाव सावरला. गप्टिलचे शतक अवघ्या ३ धावांनी हुकले. त्याला ९७ धावांवर डॅनियल सॅम्सने बाद केले. तर विल्यमसनने ३५ चेंडूत ५३ धावांची खेळी केल्यावर त्याला अ‍ॅडम झॅम्पाने माघारी पाठवले. अखेरच्या षटकांत जिमी निशमने फटकेबाजी करत १६ चेंडूत ६ षटकारांच्या मदतीने नाबाद ४५ धावांची खेळी केली. त्यामुळे न्यूझीलंडने २० षटकांत ७ बाद २१९ अशी धावसंख्या उभारली.

स्टोईनिसची खेळी वाया

२२० धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या जॉश फिलिपे (४५) आणि मॅथ्यू वेड (२४) यांनी डावाची आक्रमक सुरुवात केली. हे दोघे बाद झाल्यावर मधल्या फळीतील फलंदाज फार काळ खेळपट्टीवर टिकले नाहीत. मात्र, मार्कस स्टोईनिस (३७ चेंडूत ७८) आणि सॅम्स (१५ चेंडूत ४१) यांनी फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. परंतु, अखेरच्या षटकात निशमने या दोघांना बाद केल्याने ऑस्ट्रेलियाचा विजय हुकला. न्यूझीलंडच्या मिचेल सँटनरने ३१ धावांत ४ विकेट घेतल्या.

- Advertisement -

 

- Advertisement -