पुरुष राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा

उजाळा, शिवशंकर मंडळाची विजयी सुरुवात

उजाळा मंडळ, अंकुर स्पोर्ट्स, शिवशंकर मंडळ, सत्यम स्पोर्ट्स, गुड मॉर्गिंग स्पोर्ट्स यांनी बंड्या मारुती क्रीडा मंडळ आयोजित पुरुष राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेची विजयी सुरुवात केली आहे. तसेच स्वस्तिक मंडळाने दोन विजय मिळवत बाद फेरीतील आपले स्थान निश्चित केले. चेंबूर क्रीडा केंद्राला मात्र दोन पराभवांमुळे साखळीतच गाशा गुंडाळावा लागला.

ना.म.जोशी मार्ग येथील ललित क्रीडा केंद्राच्या प्रांगणावर होत असलेल्या या स्पर्धेच्या क गटात गुड मॉर्निंग स्पोर्ट्सने वीर परशुरामला ४६-१८ असे पराभूत केले. या सामन्याच्या मध्यंतराला गुड मॉर्निंगकडे २५-९ अशी मोठी आघाडी होती. त्यांच्या सुदेश कुळे, योगेश्वर खोपडे, स्वप्नील भादवणकर या खेळाडूंनी चांगला खेळ केला. वीर परशुरामच्या चेतन पालवनकरने चांगली झुंज दिली. फ गटात उपनगरच्या सत्यम सेवा मंडळाने मुंबईच्या बलाढ्य शिवशक्ती मंडळाचा ४७-२५ असा पराभव केला. सत्यमच्या सुनील नलावडे, नितीन देशमुख, दीपेश रामाणे यांनी उत्कृष्ट खेळ केला. शिवशक्तीचे मकरंद मसुरकर, संतोष वारकरी चांगले खेळले.

स्वस्तिक मंडळाने ग गटात दोन विजय मिळवत बाद फेरी गाठली. पहिल्या सामन्यात त्यांनी हनुमान सेवा मंडळाचा ३५-१९ असा, तर दुसर्‍या सामन्यात गोल्फादेवी मंडळाचा ३५-१६ असा पराभव केला. स्वस्तिकच्या या दोन्ही विजयांत अभिषेक चव्हाण, सिद्धेश पांचाळ, सुयोग राजापकर, निलेश शिंदे यांनी चमकदार खेळ केला. इ गटात अंकुर स्पोर्ट्सने चेंबूर क्रीडा केंद्रावर ४३-४० अशी मात करत आगेकूच केली. मध्यंतराला २१-२४ अशा ३ गुणांनी पिछाडीवर पडलेल्या अंकुर स्पोर्ट्सच्या सुशांत साईल, किसन बोटे, मिलिंद कोलते यांनी उत्तरार्धात आक्रमक खेळ करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. पूर्वार्धात चेंबूरच्या आकाश कदम आणि विराज कदम या बंधूंनी दमदार खेळ केला. मात्र, उत्तरार्धात त्यांना चांगला खेळ करता आला नाही. तसेच चेंबूर केंद्राला ठाण्याच्या मावळी मंडळाकडून ४८-२६ असा पराभव पत्करावा लागला. या दुसर्‍या पराभवामुळे चेंबूर केंद्राला साखळीतच गाशा गुंडाळावा लागला.

ब गटात शिवशंकरने अमर मंडळाला २१-१८ असे, अ गटात उजाळा मंडळाने सुनील स्पोर्ट्सला ३६-३२ असे, तर ड गटात जय भारत मंडळाने नव जवान मंडळाला ३७-१३ असे पराभूत करीत आगेकूच केली.