नवी दिल्ली : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 स्पर्धा अंतिम टप्प्यात आली आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका असे उपांत्य फेरीचे सामने होणार आहेत. मात्र दक्षिण आफ्रिका सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने याने पुढील विश्वचषक खेळण्याची आपली कोणतीही योजना नसल्याचे सोमवारी (13 नोव्हेंबर) स्पष्ट केले आहे, मात्र त्याने निवृत्तीचे कोणतेही संकेत दिलेले नाही. (Mitchell Starc A big announcement from the Australian before the semi final against South Africa)
दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या पुढील विश्वचषकापर्यंत मिचेल स्टार्क 37 वर्षांचा होणार आहे. 2015 मध्ये एकदिवसीय विश्वचषक आणि 2021 मध्ये टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाचा तो सदस्य आहे. मात्र, सध्याच्या विश्वचषकात तो आतापर्यंत 43.90 च्या सरासरीने केवळ 10 विकेट घेऊ शकला आहे. या विश्वचषकानंतरही मी खेळत राहीन, पण पुढचा विश्वचषक खेळू शकणार नाही, असा मला विश्वास आहे, असे स्टार्कने पत्रकारांशी बोलताना सांगितले.
ऑस्ट्रेलियन संघ पुढील वर्षी मर्यादित एकदिवसीय सामने खेळणार आहे. फेब्रुवारीमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेनंतर, सप्टेंबरमध्ये इंग्लंड दौऱ्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघ एकही एकदिवसीय सामना खेळणार नाही. त्यामुळे कसोटी क्रिकेटला आपले प्राधान्य असेल, असे स्टार्कने स्पष्ट केले आहे. त्याने सांगितले की, “मी नेहमी म्हणत आलो की, तीन फॉरमॅटमध्ये माझ्यासाठी कसोटी क्रिकेट सर्वात वरचे आहे आणि कसोटी क्रिकेट सोडण्यापूर्वी मी इतर फॉरमॅट सोडेन. परंतु विश्वचषक उपांत्य फेरी माझ्यासाठी किंवा संघासाठी इतर कोणत्याही एकदिवसीय सामन्यांप्रमाणेच आहे, पण माझ्यासाठी एकदिवसीय क्रिकेटमधील हा प्रवासाचा शेवट नाही.” चालू विश्वचषकातील अपेक्षेपेक्षा कमी कामगिरीसाठी ‘फ्लॅट विकेट्स’ला दोष देताना स्टार्क म्हणाला की, “मी माझ्या स्तरानुसार अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करू शकला नाही.
दरम्यान, मागील दोन विश्वचषकात प्रभावी कामगिरी करू शकलो नाही, पण आता स्पर्धेत प्रभाव पाडण्याची संधी आहे. अॅशेसपासून किरकोळ दुखापतीचा सामना करत असलेल्या स्टार्कला बांगलादेशविरुद्धच्या संघाच्या शेवटच्या साखळी सामन्यातून विश्रांती देण्यात आली होती आणि पण गुरुवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उपांत्य फेरीपूर्वी सोमवारी मिचेल स्टार्क सराव सत्रात आपल्या सहकाऱ्यांसोबत सराव करताना दिसला.
हेही वाचा – IND vs NZ : न्यूझीलंड सामन्याआधी भारतीय संघावर दबाव; राहुल द्रविडने केले भाष्य
कोलकाता येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या उपांत्य फेरीत खेळण्यासाठी तंदुरुस्त असल्याचे स्टार्कने म्हटले आहे. त्याने सांगितले की, “मी 100 टक्के तंदुरुस्त नसताना खेळलो असतो तर कदाचित मी फक्त 10 सामने खेळू शकलो असतो. कारण जगभरातील गोलंदाज कोणत्या ना कोणत्या गोष्टीशी झुंजत असतात, पण आम्ही फलंदाजांप्रमाणे त्याबद्दल बोलत नाही, असे स्टार्कने स्पष्ट केले.