भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनचा राजस्थानमध्ये अपघात

या अपघातात अझरुद्दीनला किरकोळ दुखापत झाली. 

mohammad azharuddin
मोहम्मद अझरुद्दीन

भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनच्या गाडीला बुधवारी राजस्थान येथे अपघात झाला. राजस्थानच्या सूरवाल येथे झालेल्या या अपघातात अझरुद्दीनला गंभीर दुखापत झाली नसल्याचे त्याच्या सेक्रेटरीने सांगितले आहे. एका वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार, लालसोट-कोटा मेगा हायवेवरील सुरवाल पोलिस ठाण्याजवळ अझरुद्दीनची गाडी उलटली. अझरुद्दीन कुटुंबासह रणथंभोर येथे जात होता. या अपघातात अझरुद्दीनला किरकोळ दुखापत झाली असून त्याला दुसर्‍या वाहनाने हॉटेलमध्ये नेण्यात आले.

माजी कर्णधार असणाऱ्या अझरुद्दीनने ९९ कसोटी आणि ३३४ एकदिवसीय सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण २९ शतके करणाऱ्या अझरुद्दीनने कसोटी क्रिकेटमध्ये ६२१५ आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये ९३७८ धावा केल्या होत्या. तसेच त्याने १९९२, १९९६ आणि १९९९ वर्ल्डकप स्पर्धांमध्ये भारताचे कर्णधारपद भूषवले होते. खेळण्यातून निवृत्त झाल्यानंतरही अझरुद्दीन क्रिकेटमध्ये सक्रिय असून सध्या हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचा (एचसीए) अध्यक्ष आहे.