धोनी होणार पुणेकर! पिंपरी-चिंचवडमध्ये घेतले आलिशान घर

धोनीचे पुण्यासोबत जुने नाते आहे. 

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी लवकरच पुणेकर होणार आहे. धोनीने पुण्याच्या पिंपरी-चिंचवड येथे आलिशान घर खरेदी केल्याची माहिती आहे. तो इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स संघाचे नेतृत्व करत होता. मात्र, कोरोनामुळे आयपीएलचा यंदाचा मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला होता. त्यामुळे सर्व खेळाडूंप्रमाणेच धोनी आपल्या घरी म्हणजेच रांची येथे परतला. परंतु, आता त्याने पिंपरी-चिंचवड येथे घर खरेदी केले आहे. धोनीने याआधी आयपीएलमध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. चेन्नई संघावर दोन वर्षांसाठी बंदी घालण्यात आली होती आणि त्यावेळी धोनी पुण्याच्या संघाकडून खेळला होता. त्यामुळे धोनीचे पुण्यासोबत जुने नाते आहे.

निसर्गरम्य परिसर भावला

धोनीने आपली ‘एमएसडी एंटरटेनमेंट’ नामक कंपनी सुरु केली असून मागील वर्षी या कंपनीने एक डॉक्युमेंट्रीसुद्धा प्रदर्शित केली होती. या कंपनीचे ऑफिस हे मुंबईतील अंधेरी येथे आहे. तसेच मुंबईमध्ये धोनी स्वतःचे घर बांधत आहे. धोनीची पत्नी साक्षीने याचे फोटो इंस्टाग्रामवरून शेअरही केले होते. आता मुंबई पाठोपाठ त्याने पुण्यातही घर घेतले आहे. गहुंजे येथील निसर्गरम्य परिसर भावल्यामुळे त्याने हे घर खरेदी केल्याचे समजते.

धोनीचा संघ जेतेपदासाठी दावेदार 

धोनीने मागील वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली होती. मात्र, तो अजूनही आयपीएल स्पर्धेत खेळत आहे. आयपीएलचा यंदाचा मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला होता. त्याआधी धोनीच्या नेतृत्वात चेन्नईच्या संघाने ७ पैकी ५ सामने जिंकले होते. आता उर्वरित आयपीएल सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये युएईत होणार असून या स्पर्धेचे जेतेपद पटकावण्यासाठी धोनीच्या संघाला प्रबळ दावेदार मानले जात आहे.