महेंद्रसिंग धोनी…या सम हाच!

dhoni

भारतीय क्रिकेटला महान फलंदाज आणि फिरकीपटूंचा वारसा आहे. परंतु, भारताला महान यष्टीरक्षक-फलंदाज लाभला, असे काही वर्षांपूर्वीपर्यंत म्हणता येत नव्हते. महेंद्रसिंग धोनीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एंट्रीनंतर हे चित्र बदलले. धोनीने २००४ मध्ये बांगलादेशविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि पहिल्याच सामन्यात खातेही न उघडता तो माघारी परतला. त्यानंतर तोच धोनी भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार बनेल, सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक-फलंदाज बनेल याची कोणी कल्पनाही केली नसेल. अगदी धोनीनेही!

हळूहळू त्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. आक्रमक फलंदाजी, मोठमोठे फटके, उत्तुंग षटकार या गोष्टी कोणत्या क्रिकेट चाहत्याला आवडत नाहीत? या सर्व गोष्टी धोनीमध्ये होत्या. त्यातच त्याच्या लांब केसांच्या, चालण्याच्या वेगळ्या स्टाईलमुळे धोनी अगदी गर्दीतही उठून दिसायचा. धोनीचा मैदानातील खेळही हळूहळू बहरत गेला. सातत्याने त्याच्या यष्टिरक्षणातही सुधारणा होऊ लागली. त्यामुळे दिनेश कार्तिक, पार्थिव पटेल यांच्यासारखे प्रतिभावान यष्टीरक्षक एकदा जे भारतीय संघाबाहेर गेले, ते पुन्हा परतलेच नाहीत. परंतु, धोनीने खऱ्या अर्थाने स्वतःचा वेगळा ठसा उमटवला तो २००७ टी-२० विश्वचषकात.

टी-२० क्रिकेटला त्यावेळी फारसे महत्त्व नव्हते. त्यामुळे सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड यांसारख्या आघाडीच्या खेळाडूंनी पहिल्यावहिल्या टी-२० विश्वचषकात न खेळण्याचा निर्णय घेतला. अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत कर्णधार कोणाला करायचे? हा प्रश्न निवड समितीपुढे होता. अखेर धोनीच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. धोनीच्या नेतृत्वात भारताने तो टी-२० विश्वचषक जिंकला, तेही अंतिम सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर मात करत. त्यानंतर काय? ते म्हणतात ना, ‘रेस्ट इज हिस्ट्री’!

धोनीसमोर मात्र सर्वात मोठे आव्हान होते ते, अपेक्षांचा दबाव झेलण्याचे. भारतात क्रिकेट म्हणजे धर्मच! त्यामुळे भारतीय संघाकडून चाहत्यांना नेहमीच खूप अपेक्षा असतात. मात्र, हा दबाव धोनीने ज्याप्रकारे झेलला, त्याचे कौतुक करावे तितके थोडेच. त्याच्याच नेतृत्वात भारताने भारतातच झालेल्या २०११ एकदिवसीय विश्वचषकाचेही जेतेपद पटकावले. त्याच काळात त्याने ‘फिनिशर’ म्हणूनही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्याने भारताला अनेकदा अशक्यप्राय वाटणारे विजय एकहाती मिळवून दिले.

मागील काही काळात मात्र धोनीला आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता येत नव्हती. त्यामुळे त्याच्या भविष्याबाबत बरीच चर्चा केली जात होती. आता त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. धोनीने स्वातंत्र्य दिनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. अचानक! कोणालाही अपेक्षा नसताना! अनेकांना आशा होती की, तो भारतीय संघात पुनरागमन करेल. परंतु, ते आता होणार नाही. धोनी त्याच्या ७ नंबरच्या लोकप्रिय ब्लू जर्सीमध्ये दिसणार नाही. आता चाहत्यांना याची सवय करून घ्यावी लागणार आहे. हा बदल लवकर पचनी पडणे अवघड आहे, पण सवय तर लावावीच लागेल. मात्र, धोनीने कर्णधार म्हणून, खेळाडू म्हणून जे उदाहरण भारताच्या युवा खेळाडूंसमोर ठेवले आहे, ते कधीही विसरता येणार नाही, बदलता येणार नाही, हे नक्की!