घरक्रीडामुंबई श्री शरीरसौष्ठव स्पर्धा

मुंबई श्री शरीरसौष्ठव स्पर्धा

Subscribe

किसका टाइम आएगा ?,

मुंबई, – तब्बल पावणे तीनशे खेळाडूंच्या उपस्थितीने स्फूर्तीदायक झालेल्या वातावरणात मुंबई श्रीचा महोत्सव सुरू झाला. पुरूषांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेच्या मुख्य गटात तब्बल 168 शरीरसौष्ठवपटूंचा विक्रमी सहभाग आणि फिजीक स्पोर्टस् गटात स्पर्धकांनी गाठलेल्या या शंभरीने आरोग्य प्रतिष्ठानचा मुंबई फिटनेस सोहळा ब्लॉकबस्टर हिट असल्याची ग्वाही दिली.

आज मुंबईकरांनी मुंबई श्रीच्या निमित्ताने पुन्हा एकदा मुंबईच्या शरीरसौष्ठवाची ताकद पाहिली. आठही गटात अंतिम फेरी गाठण्यासाठी तगडी टक्कर झाली. अत्यंत संघर्षमय झालेल्या या प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीसाठी 48 खेळाडू निवडण्यात आले असले तरी ऐतिहासिक मुंबई श्रीचा किताब पटकावण्यासाठी विविध गटातून पात्र ठरलेले सुशील मुरकर, अनिल बिलावा, सकिंदर सिंग, सुयश पाटील यांच्यात खरी लढत रंगणार आहे. तरीही मुंबई श्रीत चमकदार कामगिरी करण्याच्या ध्येयाने उतरलेल्या आणि उत्साहाने भारलेल्या खेळाडूंनी प्राथमिक फेरीत बाद झाल्यानंतरही मुंबई श्री में अपना टाइम आएगा, अशी प्रोत्साहित करणारी प्रतिक्रिया देत आम्हीही सज्ज होत असल्याची प्रतिक्रिया दिली.

- Advertisement -

प्राथमिक स्पर्धेतून प्रत्येक गटातून प्रत्येकी सहा खेळाडूंची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. प्रत्येक गटात 20 च्या आसपास खेळाडू असल्यामुळे मुंबईच्या पीळदार ग्लॅमरमधून अवघ्या सहा खेळाडूंची निवड करताना जजेसचा अक्षरश: घामटा निघाला. 55 किलो वजनी गटातून ओमकार आंबोकर, जीतेंद्र पाटील, राजेश तारवे आणि उपेंद्र पांटाळपैकी एक गटविजेता होऊ शकतो. 60 किलो वजनी गटात अव्वल स्थान पटकावण्यासाठी चेतन खारवाला देवचंद गावडे, अरूण पाटील यांचे आव्हान मोडीत काढावे लागणार आहे. 65 किलो वजनी गटात संदेश सकपाळवर मात करण्यासाठी बप्पन दास, उमेश गुप्ता, हेमंत भंडारी यांनी कंबर कसली आहे तर 70 किलोच्या गटात चिंतन दादरकर, राजेश खाटीकमारे, रोहन गुरव आणि आदित्य झगडे पैकी कुणीही गटविजेतेपद संपादू शकतो. गतवर्षी उपविजेता ठरलेला सकिंदर सिंग पुन्हा एकदा मुंबई श्रीचे स्वप्न करण्यासाठी सज्ज झालाय. त्याचबरोबर अभिषेक खेडेकर, सुशांत रांजणकर, निलेश दगडे यांचीही तयारी तोडीची झालेली दिसतेय. त्यामुळे या स्पर्धेत ऐतिहासिक चषक कोण पटकावतो, हे रविवारीच कळेल. किसका टाइम आया है, यह कलही पता चलेगा.

महिला गटात संघर्ष वाढला

- Advertisement -

मिस मुंबईसाठी होणार्‍या फिजीक स्पोर्टस् प्रकारात पाच पीळदार सौंदर्यवतींचा सहभाग आधीच निश्चित होता. पण आज वजन तपासणीच्या वेळेला विणा महाले, रेणूका मुदलीयार आणि प्रतिक्षा करकेरा या तिघींनीही आपल्या नावाची नोंद केली आणि या गटात खेळणार्‍या महिला खेळाडूंची संख्या आठ झाली. या गटात मंजिरी भावसार आणि दिपाली ओगले यांच्यात जेतेपदासाठी काँटे की टक्कर असली तरी नीना पंजाबी, हीरा सोलंकी आणि निशरिन पारिखचेही आव्हान त्यांच्यासमोर असेल. महिलांचा शरीरसौष्ठव खेळात सहभाग वाढावा म्हणून आमला ब्रम्हचारी आणि श्रद्धा डोके या मराठी कन्या आपलेल्या पीळदार स्नायूंचे प्रदर्शन करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. त्यांची प्रदर्शनीय लढत महिला शरीरसौष्ठवाला नक्कीच प्रोत्साहन देईल, असा विश्वास आरोग्य प्रतिष्ठानचे आयोजक प्रभाकर कदम यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -