घरक्रीडाविजय नवनाथ ज्युनियर संघाला अजिंक्यपद

विजय नवनाथ ज्युनियर संघाला अजिंक्यपद

Subscribe

मुंबई शहर जिल्हा निवड चाचणी कबड्डी

विजय नवनाथ क्रीडा मंडळ आणि शिवशक्ती महिला अ संघ यांनी मुंबई शहर कबड्डी असोसिएशन आयोजित जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या अनुक्रमे पुरुष आणि महिला ज्युनियर गटाचे अजिंक्यपद पटकावले. प्रथम श्रेणी व्यावसायिक पुरुषांत मुंबई पोलीस संघ, तर व्दितीय श्रेणी व्यावसायिक पुरुषांत टी. बी. एम. स्पोर्ट्स संघ विजेता ठरला.

नायगावच्या भारतीय क्रीडा मंदिराच्या क्रीडांगणावर झालेल्या ज्युनियर पुरुषांच्या अंतिम सामन्यात विजय नवनाथ क्रीडा मंडळाने न्यू परशुराम क्रीडा मंडळावर ३३-२२ अशी मात करत स्व. दत्ताजी नलावडे स्मृती चषक आपल्या नावे केला. विजय नवनाथने या सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत मध्यंतराला २३-९ अशी मोठी आघाडी मिळवली. त्यांच्या या विजयात हर्ष लाड, दीप बोर्डवेकर, प्रथमेश दहीबावकर हे खेळाडू चमकले.

- Advertisement -

ज्युनियर महिलांचा अंतिम सामना शिवशक्तीच्या दोन संघात झाला. त्यात शिवशक्ती अ संघाने शिवशक्ती ब संघाला १०-५ असे पराभूत करत स्व. द्रौपदी मारुती जाधव स्मृती चषक पटकावला. प्रतीक्षा तांडेल, साक्षी रहाटे, साधना विश्वकर्मा यांनी शिवशक्ती अकडून चांगला खेळ केला.

व्यावसायिक प्रथम श्रेणी पुरुषांच्या अंतिम सामन्यात मुंबई पोलीस संघाने मुंबई पोष्टल संघाला ३१-२९ असे नमवले. विठ्ठल कट्टामणी, लवु गर्जे यांच्या खेळाच्या जोरावर पूर्वार्धात पोलीस संघाने १५-१० अशी आघाडी घेतली. रोशन परब, श्रीकांत पाटील यांनी उत्तरार्धात आपला खेळ उंचावत मुंबई पोष्टलला हा सामना जिंकवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते २ गुणांनी पराभूत झाले.

- Advertisement -

व्यावसायिक व्दितीय श्रेणी पुरुषांच्या अंतिम सामन्यात टी. बी. एम. स्पोर्ट्सने शिवास इंटरप्रायझेसचा २७-२६ असा पराभव केला. जितेश पाटील, रोहित मोकल टी. बी. एम.कडून, तर आदिनाथ घुले, चांदसाब बागा शिवासकडून उत्तम खेळले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -