विजय नवनाथचा चौथ्या फेरीत प्रवेश

मुंबई शहर जिल्हा निवड चाचणी कबड्डी

खडा हनुमान, अमर मंडळ, विजय नवनाथ या संघांनी मुंबई शहर कबड्डी असोसिएशन आयोजित जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत मुलांच्या ज्युनियर गटाची चौथी फेरी गाठली. नायगाव येथील भारतीय क्रीडा मंदिराच्या क्रीडांगणावर सुरू असलेल्या या स्पर्धेतील मुलांच्या ज्युनियर गटाच्या तिसर्‍या फेरीत खडा हनुमानने वारसलेनला ५२-४० असे नमवले. प्रसाद घाग, तन्मय होंगाळे यांच्या चतुरस्त्र खेळाच्या जोरावर खडा हनुमानाने विश्रांतीला २८-११ अशी आघाडी घेतली.

याच गटात विजय नवनाथने अत्यंत चुरशीच्या ५-५ चढायांत विजय क्लबचा ३३-३१ (६-४) असा पराभव केला. हर्ष लाड, प्रथमेश दहीबावकर यांनी विजय नवनाथला मध्यंतराला ११-९ अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, दुसर्‍या डावात विजय क्लबच्या दिग्विजय भाटकर, आस्वाद केवट यांनी पूर्ण डावाच्या अखेरीस आपल्या संघाला २७-२७ अशी बरोबरी साधून दिली. परंतु, ५-५ चढायांच्या डावात विजय नवनाथ संघाने ६-४ अशी बाजी मारली. अमर क्रीडा मंडळाने शिवप्रेरणा प्रतिष्ठानला ४४-४३ असे पराभूत करत आगेकूच केली. या सामन्याच्या मध्यंतराला अमरकडे २४-१५ अशी आघाडी होती. अमरच्या या विजयात शुभम घाडे, अक्षय कारविलकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

श्री राम क्रीडा मंडळाने आदर्श क्रीडा मंडळावर ३६-२७ अशी मात केली. गणेश महाजन, तुषार शिंदे श्री रामकडून, तर शुभम हुमणे, संकेत घाणेकर आदर्श कडून उत्कृष्ट खेळले. भवानीमाता प्रतिष्ठानने दुर्गामाता बालमित्राला २६-१६ असे, न्यू परशुराम क्रीडा मंडळाने यंग प्रभादेवी क्रीडा मंडळाला ५०-३३ असे पराभूत केले.