जय दत्तगुरु उपांत्य फेरीत

मुंबई शहर अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा

कबड्डी स्पर्धा

जय दत्तगुरु क्रीडा मंडळ, महागाव तरुण सेवा मंडळ या संघांनी मुंबई शहर कबड्डी असोसिएशन आयोजित जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेतील ज्युनियर गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय क्रीडा मंदिराच्या पटांगणात सुरू असलेल्या या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात जय दत्तगुरु मंडळाने श्री साई क्रीडा मंडळावर ३२-३१ अशी अवघ्या एका गुणाने मात केली. या सामन्याच्या मध्यंतराला श्री साई क्रीडा मंडळाकडे १६-१४ अशी आघाडी होती. मात्र, उत्तरार्धात त्यांचा खेळ खालावला. दीपेश चव्हाण, रुपेश बागल, साईल सारंग यांच्या अप्रतिम खेळामुळे जय दत्तगुरु मंडळाने हा सामना जिंकला.

दुसरीकडे महागाव तरुण मंडळाने जय भारत सेवा मंडळ संघाचा ५२-२९ असा पराभव केला. स्वप्नील खदाले, सतीश रोडे यांच्या उत्तम चढाया आणि सिद्धेश येसणेच्या पकडीच्या खेळाला या विजयाचे श्रेय जाते. ओम पिंपळेश्वरने अमर संदेशाचा ४३-१४ असा धुव्वा उडवला. चेतन गावकर, गणेश गुप्ता, संदेश गुडेकर यांचा खेळ ओम पिंपळेश्वरच्या विजयात महत्वपूर्ण ठरला. सक्षम क्रीडा मंडळाने आकांक्षा क्रीडा मंडळाला ३२-२० असे पराभूत करत आगेकूच केली. सक्षमच्या विजयात सुबोध माने, सुरेंद्र शेंडकर, संदेश गुडेकर चमकले.