घरक्रीडाबाबरशेख, महेश मंडळाचा तिसर्‍या फेरीत प्रवेश

बाबरशेख, महेश मंडळाचा तिसर्‍या फेरीत प्रवेश

Subscribe

मुंबई शहर निवड चाचणी कबड्डी स्पर्धा

महेश मंडळ, माऊली स्पोर्ट्स, बाबारशेख, अभिनव नगर चाळ कमिटी,आंबेवाडी, लायन्स स्पोर्ट्स या संघांनी मुंबई शहर कबड्डी असोसिएशन आयोजित पुरुष तृतीय श्रेणी गट कबड्डी स्पर्धेच्या तिसर्‍या फेरीत प्रवेश केला आहे. वडाळा येथील भारतीय क्रीडा मंदिराच्या पटांगणावर सुरु असलेल्या या स्पर्धेच्या दुसर्‍या फेरीत बाबरशेखने नवनाथचा ३६-२१ असा पराभव केला. या सामन्याच्या मध्यंतराला नवनाथकडे १८-११ अशी आघाडी होती. मात्र, मध्यंतरानंतर बाबारशेख संघाने उत्कृष्ट खेळ करत हा सामना जिंकला. बाबरशेखकडून आकाश पारकर, सचिन राऊत यांनी अप्रतिम खेळ केला.

तसेच माऊली स्पोर्ट्सने ५-५ चढायांच्या जादा डावात गांगोबा प्रसन्न स्पोर्ट्सला ३७-३६ (७-६) असे नमवत आगेकूच केली. गांगोबा संघ मध्यंतराला ९-१३ असा पिछाडीवर होता. मात्र, त्यानंतर त्यांनी आपला खेळ उंचावत नियमित सामन्यात ३०-३० अशी बरोबरी केली. त्यामुळे ५-५ चढायांचा जादा डाव खेळवावा लागला, ज्यात माऊली स्पोर्ट्सने ७-६ अशी बाजी मारली. अंकुश नवले, विक्रात जाधव, शुभम फाटक यांनी माऊलीकडून, तर समीर गोवळकर, अमोल, अविनाश खाटके गांगोबाकडून चांगले खेळले.

- Advertisement -

महेश मंडळाने श्री दत्तगणेशला ५-५ चढायांच्या जादा डावात ४२-३५ (९-२) असे पराभूत केले. या सामन्याच्या मध्यंतराला श्री दत्तगणेशकडे १६-१३ अशी आघाडी होती. नियमित सामना संपताना दोन्ही संघांची ३३-३३ अशी बरोबरी झाली. वैभव पाटील, अमेय कुंभार, मिथिल खातू यांनी महेश संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. अभिनव नगर चाळ कमिटीने शताब्दी स्पोर्ट्सचा ३८-२८ असा पराभव केला.

आंबेवाडी मंडळाने चुरशीच्या लढतीत शिवगर्जनाला २५-२४ असे नमवत आगेकूच केली. संतोष आयरे, सिद्धेश कदम, सर्वेश पोपटकर यांनी उत्तम खेळ केला. शिवगर्जनाच्या मयूर खोत, रवींद्र खोत, करणं खोत चांगली झुंज दिली. लायन्स स्पोर्ट्सने विक्रम मोरे, योगेश कोकरे यांच्या चढाई-पकडीच्या उत्तम खेळाच्या बळावर शिवशंकर संघावर ३६-३२ अशी मात केली.

- Advertisement -

इतर निकाल – १) बालगोपाल क्रीडा मंडळ विजयी वि. ओम त्रिशूल क्रीडा मंडळ (२८-२१), २) खडा हनुमान क्रीडा मंडळ विजयी वि. दोस्ती क्रीडा मंडळ (३७-३०), ३) बॉस स्पोर्ट्स क्लब विजयी वि. गोल्डन क्रीडा मंडळ (४७-३१), ४) लालबाग स्पोर्ट्स क्लब विजयी वि. श्री कालभैरव क्रीडा मंडळ (४२-३३), ५) बालविकास मित्र मंडळ विजयी वि. बळीराम क्रीडा मंडळ (३६-२७), ६) युवा गर्जना क्रीडा मंडळ विजयी वि. महापुरुष क्रीडा मंडळ (४४-३०).

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -