यशस्वीच्या रूपात मुंबईला पुन्हा ‘खडूस’ खेळाडू गवसला!

मुंबई म्हणजे भारतीय स्थानिक क्रिकेटमधील सर्वात यशस्वी आणि नावाजलेला संघ. मुंबईने तब्बल ४१ वेळा रणजी करंडकाचे जेतेपद पटकावले आहे, पण या संघाला मागील दोन-तीन रणजी मोसमांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. मात्र, प्रशिक्षक विनायक सामंत यांच्या मार्गदर्शनात पुन्हा एकदा स्थानिक क्रिकेटमधील ’दादा’ संघ बनण्याचे मुंबईचे लक्ष्य आहे. मुंबईच्या यंदाच्या मोसमातील कामगिरीबद्दल, रणजी करंडकाच्या आगामी मोसमाबद्दल आणि संघातील काही प्रमुख खेळाडूंबद्दल प्रशिक्षक सामंत यांनी ’आपलं महानगर’शी खास बातचीत केली.

# मुंबईने यंदाच्या मोसमात विजय हजारे एकदिवसीय स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी, तर सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली होती. या दोन स्पर्धांमधील कामगिरीबाबत काय सांगाल?

– आम्ही दोन्ही स्पर्धांमध्ये चांगले खेळलो. विजय हजारे स्पर्धेत पावसामुळे आम्ही आगेकूच करू शकलो नाही. मात्र, आम्हाला ही स्पर्धा जिंकण्याची संधी होती. मुश्ताक अली स्पर्धेच्या सुपर लीगमधील तामिळनाडूविरुद्धचा पहिला सामना आम्ही गमावला. या सामन्यात आम्ही नाणेफेक जिंकलो असतो, तर कदाचित आम्ही हा सामनाही जिंकला असता. या दोन स्पर्धांमधून आम्हाला खूप शिकायला मिळाले. आता रणजीमध्ये प्रत्येक सामन्यात चांगला खेळ करत अंतिम फेरी गाठण्याचा आमचा प्रयत्न असेल.

# रणजीच्या नव्या मोसमाला ९ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मोसमासाठी संघाने कशाप्रकारे तयारी केली?

– यंदा आम्हाला सरावासाठी केवळ दोन-तीनच दिवस मिळाले. मात्र, मी नेहमी सकारात्मक विचार करतो. आम्ही यातूनही काहीतरी चांगले करु. आम्हाला फारसा सराव करता आला नसला, तरी मला माझ्या संघावर पूर्ण विश्वास आहे. आम्ही या मोसमात चांगली कामगिरी करू याची मला खात्री आहे.

# कर्नाटकाने विजय हजारे आणि सय्यद मुश्ताक अली करंडक या दोन्ही स्पर्धा जिंकल्या. रणजीतही त्यांच्याविरुद्ध खेळणेच सर्वात आव्हानात्मक असेल?

– प्रत्येक गोष्ट त्या-त्या दिवसावर अवलंबून असते. कर्नाटकाचा संघ प्रत्येक सामन्यात चांगला खेळला आणि त्यांना नशिबाचीही थोडी साथ मिळाली. मात्र, आम्ही त्यांना याआधी हरवले आहे. विजय हजारे स्पर्धेत आम्ही केवळ ९ धावांनी सामना गमावला होता. क्रिकेटमध्ये कोणताही संघ कोणत्याही संघाचा पराभव करू शकतो. तुम्ही प्रामाणिकपणे खेळणे गरजेचे असते. आमचा योजनेप्रमाणे गोलंदाजी आणि फलंदाजी करत दिवसातील जास्तीतजास्त सत्रे जिंकण्याचा प्रयत्न असेल.

# मुंबईचा रणजीतील सलामीचा सामना बडोदाविरुद्ध होणार असून या सामन्यात अजिंक्य रहाणे खेळणार आहे. त्याचा अनुभव संघासाठी किती महत्त्वाचा आहे?

– मागील मोसमात रहाणे विजय हजारे करंडकाचे पहिले चार सामने खेळला होता आणि आम्ही ती स्पर्धा जिंकली. त्याच्या अनुभवाचा आम्हाला खूप फायदा होतो. तो खूप मोठा खेळाडू आहे आणि त्याची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तो खेळाशी प्रामाणिक आहे. त्याची संघासाठी काहीही करण्याची तयारी असते. तो संघात असल्यामुळे इतर खेळाडूंचा आत्मविश्वास आपोआपच वाढतो आणि प्रतिस्पर्धी संघावर दबाव येतो.

# मागील वर्षी तुम्ही म्हणाला होतात की, आम्हाला फलंदाजीची चिंता नाही. मात्र, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात सुधारणा झाली पाहिजे. यंदाच्या मोसमात तुम्हाला काही बदल जाणवत आहे?

– क्षेत्ररक्षणाची नक्कीच चिंता आहे. एकदिवसीय आणि टी-२० सामन्यांमध्ये बरेचदा फलंदाज फटकेबाजी करण्याच्या नादात स्वतःच विकेट देतात. मात्र, चार-पाच दिवसीय सामन्यांत तुम्हाला विकेट्स मिळत नाहीत, त्या काढाव्या लागतात. त्यामुळे गोलंदाजांनी सातत्याने योग्य टप्प्यावर गोलंदाजी करणे गरजेचे असते. तसेच गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांची साथ मिळणे आवश्यक असते. खासकरून स्लिप, शॉर्ट लेगवरील खेळाडूंनी झेल पकडणे महत्त्वाचे असते. यंदा आधीच्या दोन स्पर्धांमध्ये दोन्ही क्षेत्रांत सुधारणा दिसली.

# सूर्यकुमार यादवने यंदा सर्वांनाचा प्रभावित केले आहे. मुश्ताक अली करंडकाप्रमाणे रणजी करंडकासाठीही त्याची कर्णधारपदी निवड झाली आहे. पूर्वी त्याच्यात संयम आणि सातत्याची कमी आहे असे म्हटले जायचे. यंदा वेगळा सूर्यकुमार पाहायला मिळतोय का?

– यंदा नक्कीच वेगळा सूर्यकुमार पाहायला मिळत आहे. मागील मोसमातही कर्णधारपदासाठी मी त्याचे नाव सुचवले होते, पण काही कारणांमुळे त्याची कर्णधार म्हणून निवड झाली नाही. यंदा मात्र तो मुंबईचे नेतृत्व करणार आहे. तो कर्णधार म्हणून आणि फलंदाज म्हणूनही उत्तम कामगिरी करत आहे. तो संघाला बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे.

# सूर्यकुमार आयपीएलच्या मागील दोन मोसमांत मुंबई इंडियन्सकडून खेळला. रोहित शर्मा या संघाचे कर्णधारपद भूषवतो. त्याच्या नेतृत्वात खेळल्याचा सूर्यकुमारला कसा फायदा झाला आहे?

– रोहितसारख्या खेळाडूंसोबत खेळल्याचा नक्कीच फायदा होतो. आयपीएलमध्ये विविध देशांतील मोठ्या खेळाडूंसोबत ड्रेसिंग रूममध्ये एकत्र राहून, त्यांच्यासोबत खेळून आपल्या युवा खेळाडूंना खूप शिकायला मिळते. सूर्यकुमारही या खेळाडूंकडून शिकून आपल्या खेळात बदल करत आहे.

# पृथ्वी शॉवर डोपिंगमध्ये दोषी आढळल्यामुळे आठ महिन्यांची बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर त्याने मुश्ताक अली स्पर्धेत दमदार (५ सामन्यांत २४० धावा) पुनरागमन केले. त्याच्यात काही बदल जाणवतोय का?

– पृथ्वीतील प्रतिभेबद्दल, त्याच्या खेळाबद्दल कधीच काही प्रश्न नव्हता. मात्र, आता त्याला पुन्हा शून्यापासून सुरुवात करावी लागणार आहे. त्यामुळे तो संघासाठी आणि स्वतःसाठीही खूप धावा करेल अशी मला अपेक्षा आहे. पृथ्वी हा असा खेळाडू आहे की, तो खेळपट्टीवर असताना धावांचा वेग खूप चांगला असतो. त्याने फक्त जास्तीतजास्त वेळ खेळपट्टीवर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

# यशस्वी जैस्वालबाबत खूप चर्चा होत आहे. त्याने विजय हजारे स्पर्धेत उत्कृष्ट (६ सामन्यांत ५६४ धावा) कामगिरी केली. त्याच्याकडून खूप अपेक्षा केल्या जात आहेत. त्याच्याबाबत काय सांगाल?

– यशस्वी खूप मेहनती मुलगा आहे. त्याच्यात काहीतरी करण्याची जिद्द आहे. त्याच्या रूपात मुंबईला खूप वर्षांनी पुन्हा एक खडूस खेळाडू मिळाला आहे. सचिन तेंडुलकर, संजय मांजरेकर, दिलीप वेंगसरकर, सुनील गावस्कर या मुंबईच्या मोठ्या खेळाडूंमध्ये जो खडूसपणा होता, तो मला यशस्वीमध्ये दिसतो. तो जे ठरवतो, ते करतोच. त्याच्यासारख्या खेळाडूंची मुंबईला गरज आहे. तो भविष्यात नक्कीच भारतासाठी खेळू शकेल.

# तुम्ही खूप वर्षे मुंबईकडून खेळलात. त्या संघांमध्ये आणि आताच्या संघात व खेळाडूंमध्ये काय फरक आहे?

– पूर्वी खेळाडूंना स्वतःला सिद्ध करण्यासाठी फार सामने मिळत नव्हते. त्यामुळे मुंबईसाठी केलेल्या कामगिरीला फार महत्त्व होते. आता खेळाडूंना मुंबईसाठी चांगली कामगिरी नाही करता आली, तरी आयपीएल किंवा इतर एखाद्या स्पर्धेतील कामगिरी, भारत ’अ’ संघासाठी केलेल्या कामगिरीच्या आधारे भारतासाठी खेळण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे आताचे खेळाडू मुंबईसाठी खेळताना पूर्वीच्या खेळाडूंपेक्षा जरा कमी उत्सुक असतात, असे आपण म्हणू शकतो.