IPL 2021 : मुंबईला प्ले-ऑफ प्रवेशासाठीचे काय आहेत पर्याय ?

Mumbai Indians

मुंबई इंडियन्ससाठी करो या मरो अशा मंगळवारच्या राजस्थान विरूध्दच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने मोठा विजय मिळवून प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठीच्या आशा कायम ठेवल्या आहेत. मुंबईच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठे फेरबदल झाले आहेत. कोलकत्ता १२ अंकासह ४थ्या, मुंबई १२ अंकासह ५ व्या, तर त्यापाठोपाठ राजस्थान रॉयल्स १० अंकासह ७ व्या स्थानावर आहे, मुंबईला प्ले-ऑफसाठी अजून एका विजयासह चांगल्या नेट रननेटची गरज आहे. मुंबईचा शेवटचा सामना हैद्राबाद सोबत आहे, त्यात संघाला विजयाची गरज आहे.

MI चे कसे आहेत प्ले ऑफचे पर्याय ?

गुणतालिकेत चौथ्या स्थानावर असलेल्या कोलकत्ता संघालाही प्ले-ऑफचे दरवाजे अद्याप खुले आहेत. कोलकत्ताचा शेवटचा सामना राजस्थान विरूध्द होणार आहे, त्या सामन्याचा निकाल मुंबईच्या प्ले-ऑफच्या प्रवेशासाठी निर्णायक भूमिका ठरवणार आहे. कोलकत्ता संघाने राजस्थानवर रॉयल्सवर विजय मिळवला, तर मुंबईचा प्ले-ऑफचा मार्ग खडतर होण्याची चिन्हं आहेत. तसे झाल्यास मुंबईला हैद्राबाद विरूद्धच्या सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल.

आयपीएल २०२१ च्या गुणतालिकेतील प्रथम ३ संघानी प्ले-ऑफसाठी आपली जागा निश्चित केली आहे. गुणतालिकेत चौथा क्रमांत प्राप्त करून प्ले-ऑफसाठी कोलकत्ता आणि मुंबई या दोन संघात संघर्ष पहायला मिळणार आहे. कोलकत्ता संघाचा नेट रन रेट +०.२९ असा आहे, तर मुंबईचा -०.०५ असा आहे. मुंबईच्या तुलनेत केकेआरचा नेट रनरेट चांगला आहे. त्यामुळे केकेआर आणि राजस्थानचा सामना मुंबईच्या प्ले-ऑफसाठी निर्णायक ठरणार आहे.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा टूर्नामेंटच्या शेवटच्या सामन्याबाबत उत्सुक असल्याचे सांगितले आहे. मुंबईचा शेवटचा सामना सनरायझर्स हैद्राबाद सोबत आहे. मंगळवारच्या विजयानंतर माझ्या संघाला प्ले-ऑफच्या प्रवेशासाठी कशाची गरज आहे, याची जाणीव असून त्यावर आम्ही प्रयत्नशील असल्याचे रोहितने यावेळी सांगितले.

राजस्थान विरूध्दच्या विजयानंतर मुंबईच्या प्ले-ऑफच्या आशा झाल्या पल्लवीत..

मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रतिस्पर्धी संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आवाहन केले. राजस्थान रॉसल्सची सुरूवात अत्यंत बिकट झाली, याचाच फायदा मुंबईच्या बॉलर्स ना होत गेला अखेर २० षटकांत ९ बाद ९० धावांवर राजस्थानची इनिंग संपली. या धावसंख्येला प्रत्युत्तर देताना मुंबई कडून आक्रमक सुरूवात पहायला मिळाली. सलामी जोडीच्या धडाकेबाज खेळीने मुंबईचा संघ विजयाकडे कूच करत होता. अखेर ईशान किशनच्या अर्धशतकीय खेळीच्या बदल्यात ८ गडी आणि ११.४ षटके राखून मुंबईने राजस्थानवर विजय मिळवला.

संघ                 सामने    विजयी     पराभूत   गुण

दिल्ली कॅपिटल्स    १३       १०          ३       २०
सीएसके              १३        ९          ४        १८
आरसीबी             १२        ८          ४        १६
केकेआर              १३       ६           ७       १२
मुंबई इंडियन्स        १३       ६           ७       १२
पंजाब किंग्ज          १३       ५           ८       १०
राजस्थान              १३       ५           ८       १०
हैद्राबाद               १२        २          १०       ४