घरक्रीडाजॉली स्पोर्ट्स, देऊलवाडी ओवळीची विजयी सलामी

जॉली स्पोर्ट्स, देऊलवाडी ओवळीची विजयी सलामी

Subscribe

मुंबई उपनगर जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा-२०१९.

जॉली स्पोर्ट्स, देऊलवाडी ओवळी, जागर मंडळ, अंबिका संघ यांनी मुंबई उपनगर कबड्डी असो. आयोजित जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या प्रथम श्रेणी (ब ) गटात विजयी सलामी दिली. नेहरू नगर – कुर्ला येथे आजपासून सुरू झालेल्या या गटातील पहिल्या सामन्यात जॉली स्पोर्ट्ससने मुलुंड क्रीडा मंडळावर ३७-१६ अशी मात केली. तर देऊळवाडी ओवळी मंडळाने गावदेवी क्रीडा मंडळाचा ४३-१३ असा सहज पराभव केला. मध्यांतराला २३-०६ अशी आघाडी घेणार्‍या देऊळवाडीच्या विजयाचे श्रेय संकेत दाडशी, सुरज जाधव यांच्या चमकदार खेळाला जाते.

गावदेवीचा संजय धुमाळ बरा खेळला. याच गटात जागर क्रीडा मंडळाने संकल्प प्रतिष्ठानचा ३७-१४ असा पराभव केला. अंबिका सेवा संघाने चुरशीच्या लढतीत सह्याद्री मंडळाचा प्रतिकार ३६-२४ असा मोडून काढला. शैलेश गारळे, अक्षय कांबळे यांच्या चढाई – पकडीच्या खेळाला या विजयाचे श्रेय जाते.

- Advertisement -

कुमार गटाच्या दुसर्‍या फेरीच्या सामन्यात शूर संभाजी क्रीडा मंडळाने पार्ले महोत्सव संघाचा ३५-१४ असा पराभव करीत तिसरी फेरी गाठली. अभिषेक सिंह, राहुल पवार यांच्या चढाई-पकडीच्या खेळामुळे हा विजय शक्य झाला. पार्लेचा आदेश शिंदे चमकला. गुरुदत्त मंडळाने स्वामी समर्थ स्पोर्ट्सचा ३३-१७ असा पराभव केला. मध्यांतराला दोन्ही संघ ९-९ असे बरोबरीत होते. मध्यांतरानंतर गुरुदत्तच्या चंद्रप्रकाश राय, आकाश संकपाळ यांनी आपला गिअर बदली करीत हा विजय साकारला. स्वामी समर्थचे मंगेश शेलार, योगेश ठाकूर यांना उत्तरार्धात खेळ उंचावणे जमले नाही.

स्वस्तिक क्रीडा मंडळाने शूर जवान कबड्डी संघाला २९-१९ असे नमविले. सिद्धेश पांचाळ, आदिनाथ गायकवाड स्वस्तिककडून, तर शूर जवानकडून कुणाल पाटील, अंकुश लातम छान खेळले. जय मल्हार स्पोर्टसने सन्मित्र क्रीडा मंडळाला चुरशीच्या लढतीत २३-२१ असे चकवीत आगेकूच केली. पहिल्या डावातील ०७-१४ असे पिछाडीवरून रोहन चौगुले, शुभम घाणेकर यांनी झंजावाती खेळ करीत जय मल्हारला हा विजय मिळवून दिला. प्रितेश कंक, प्रथमेश शेळके यांचा खेळ दुसर्‍या डावात खेळ उंचावता आला नाही. त्यामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -