घरक्रीडामुंबईचे पहिल्या विजयाचे लक्ष्य

मुंबईचे पहिल्या विजयाचे लक्ष्य

Subscribe

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) गुरुवारी रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स आणि विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना होणार आहे. हा या दोन्ही संघांचा या मोसमातील दुसरा सामना असणार आहे. पहिल्या सामन्यात मुंबईचा दिल्ली कॅपिटल्सने तर बंगळुरूचा चेन्नई सुपर किंग्सने पराभव केला होता. त्यामुळे हा सामना जिंकत या मोसमातील पहिला विजय मिळवण्याचे दोन्ही संघांचे लक्ष्य असेल. मागील सामन्यात मुंबईचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या खांद्याला दुखापत झाली. त्यामुळे तो या सामन्यात खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे. मात्र, तो जर खेळला तर जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज कोहली आणि गोलंदाज बुमराह यांच्यातील सामन्याकडे सर्वांचे लक्ष असेल.

मुंबईसाठी नव्या मोसमाची सुरुवात चांगली झाली नाही. आपल्या घरच्या मैदानावरच त्यांचा दिल्लीने पराभव केला. या सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांना चांगले प्रदर्शन करता आले नाही. रिषभ पंत, शिखर धवन यांसारख्या फलंदाजांनी त्यांची चांगलीच धुलाई केली. मिचेल मेकल्यानघनने या सामन्यात ३ विकेट तर घेतल्या, मात्र त्यासाठी त्याने ४० धावा खर्च केल्या. त्यामुळे या सामन्यात लसिथ मलिंगाला संधी मिळण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय सामने आणि दुखापती यामुळे मुंबईकडे परदेशी खेळाडूंचे फारसे पर्याय उपलब्ध नाहीत. तसेच बुमराह जर फिट नसेल तर त्याच्या जागी बिरिंदर स्रान किंवा लेगस्पिनर मयांक मार्कंडेला संधी मिळण्याची शक्यता आहे. फलंदाजांमध्ये अनुभवी युवराज सिंगने दिल्लीविरुद्ध अर्धशतकी खेळी केली. मात्र, त्याला कृणाल पांड्या आणि क्विंटन डी कॉक वगळता इतर फलंदाजांनी चांगली साथ दिली नाही. त्यामुळे हा सामना जिंकायचा असल्यास त्यांना आपला खेळ उंचवावा लागेल.

- Advertisement -

दुसरीकडे चेन्नईने या मोसमाच्या सलामीच्या लढतीत बंगळुरूचा दारुण पराभव केला. बंगळुरूचा डाव अवघ्या ७० धावांवर संपुष्टात आला. चेपॉकच्या संथ खेळपट्टीवर पार्थिव पटेल (२९) वगळता एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. मात्र, त्यांच्या गोलंदाजांनीही चेन्नईला हे आव्हान पूर्ण करण्यासाठी चांगलेच झुंजवले ही आनंदाची बातमी होती. मुंबईविरुद्धच्या सामन्यात चित्र थोडे वेगळे असण्याची शक्यता आहे. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमची खेळपट्टी ही फलंदाजांना अनुकूल असेल असा अंदाज आहे. त्यामुळे या सामन्यात बंगळुरूच्या फलंदाजांना मोठी खेळी करण्याची संधी आहे. बंगळुरू आणि मुंबई यांच्यात आतापर्यंत एकूण २५ सामने झाले आहे. यापैकी १६ सामने मुंबईने तर ९ सामने बंगळुरूने जिंकले आहेत. त्यामुळे या सामन्यात कोण जिंकणार हे पाहणे रंगतदार ठरणार आहे.

संभाव्य ११ खेळाडू –

- Advertisement -

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, युवराज सिंग, किरॉन पोलार्ड, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, बेन कटिंग/ लसिथ मलिंगा, मिचेल मेकल्यानघन, रसिक सलाम, जसप्रीत बुमराह/ मयांक मार्कंडे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : विराट कोहली (कर्णधार), पार्थिव पटेल (यष्टीरक्षक), मोईन अली, एबी डी व्हिलियर्स, शिमरॉन हेटमायर, शिवम डूबे, कॉलिन डी ग्रँडहोम, नवदीप सैनी, युझवेंद्र चहल, उमेश यादव, मोहम्मद सिराज.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -