डोंबिवली टी-20 लीग क्रिकेट स्पर्धेचे मुंडे स्पोर्ट्स क्रिकेट क्लबने पटकावले जेतेपद

निळजे येथील संत मारुतीबुवा लक्ष्मण पाटील क्रीडांगणावर खेळवण्यात आलेल्या या निर्णायक लढतीत परिक्षितने संघाला एकहाती विजय मिळवून देताना प्रतिस्पर्धी संघाला नेस्तनाबूत केले.

डोंबिवली टी-20 लीग क्रिकेट (Dombivali T-20 league cricket) स्पर्धेत मुंडे स्पोर्ट्स क्रिकेट क्लबने 104 धावांनी प्रविण तांबे क्रिकेट अकॅडमी संघाचा पराभव करत स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. या सामन्यात परिक्षित वेळसंगकर यांनी अष्टपैलू कामगिरी केली.

निळजे येथील संत मारुतीबुवा लक्ष्मण पाटील क्रीडांगणावर खेळवण्यात आलेल्या या निर्णायक लढतीत परिक्षितने संघाला एकहाती विजय मिळवून देताना प्रतिस्पर्धी संघाला नेस्तनाबूत केले. सुरुवातीला ७५ चेंडूत सोळा चौकार आणि पाच षटकार ठोकत १२३धावांची शतकी खेळी आणि नंतर १५ धावांत दोन विकेट्स मिळवत परिक्षितने संघाला महत्वपूर्ण विजय मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले.

मुंडे स्पोर्ट्स क्रिकेट क्लबने २० षटकात १ बाद २०५ धावांचे आव्हान प्रतिस्पर्ध्यासमोर उभे केले. प्रसाद पवारने २८ चेंडूत तीन चौकार आणि चार षटकारांच्या सहाय्याने ५२ धावा केल्या. या डावातील एकमेव विकेट अमन खानने मिळवली.

या आव्हानाचा पाठलाग करताना प्रविण तांबे क्रिकेट अकॅडमी संघाला २० षटकात आठ फलंदाजांच्या मोबदल्यात १०१ धावांपर्यंत मजल मारता आली. त्यांच्या सर्वेश लोकी (३१) आणि अमन खानचा (१९) अपवाद वगळता इतर फलंदाजांना छाप पाडता आली नाही. परिक्षितच्या जोडीने पुष्कराज चव्हाणने २३ धावांत दोन फलंदाज बाद केले.अभय पाटील, यश जाधव आणि यश डिचलकरने प्रत्येकी एक विकेट मिळवली.

स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू

  • क्षेत्ररक्षक :अर्जुन थापा (प्रविण तांबे क्रिकेट अकॅडमी)
  • गोलंदाज : दिक्षांत गुरम (विजय शिर्के क्रिकेट अकॅडमी)
  • फलंदाज आणि सर्वोत्तम खेळाडू : विशाल रंगलानी (मुंडे स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमी)

हेही वाचा – Viral video : पंजाबचा संघ प्ले ऑफमध्ये न गेल्याने धवनला वडिलांकडून मारहाण