घरक्रीडापुजारा, जाडेजासह भारताच्या पाच क्रिकेटपटूंना नाडाची नोटीस

पुजारा, जाडेजासह भारताच्या पाच क्रिकेटपटूंना नाडाची नोटीस

Subscribe

राहण्याच्या ठिकाणांची माहिती देण्यात केला विलंब

चेतेश्वर पुजारा, रविंद्र जडेजा आणि लोकेश राहुल यांच्यासह भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशी (बीसीसीआय) करारबद्ध असलेल्या पाच क्रिकेटपटूंना राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य प्रतिबंधित संस्थेने (नाडा) नोटीस बजावली आहे. पुजारा, जाडेजा, राहुल यांच्या व्यतिरिक्त स्मृती मानधना आणि दीप्ती शर्मा या महिला क्रिकेटपटूंनी राहण्याच्या ठिकाणांची माहिती देण्यात विलंब केल्याने नाडाने त्यांना ही नोटीस पाठवली आहे. परंतु, पासवर्डमध्ये गडबड झाल्याने हा विलंब झाल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले.

राष्ट्रीय नोंदणीकृत परीक्षण पूलमध्ये (एनआरटीपी) सहभागी असलेल्या ११० क्रिकेटपटूंमध्ये या पाचही जणांचा समावेश आहे. पाच क्रिकेटपटूंनी राहण्याच्या ठिकाणांची माहिती देण्यात का विलंब केला, याचे स्पष्टीकरण देणारे अधिकृत पत्र बीसीसीआयने नाडाला पाठवले आहे. याबाबतची माहिती नाडाचे महानिर्देशक नवीन अग्रवाल यांनी दिली.

- Advertisement -

अ‍ॅडम्स (उत्तेजक द्रव्य प्रतिबंधित प्रशासन आणि व्यवस्थापन प्रणाली) सॉफ्टवेअरमध्ये राहण्याच्या ठिकाणाचा फॉर्म दोन पद्धतीने भरता येतो. एक म्हणजे खेळाडू स्वतः फॉर्म भरू शकतात किंवा त्यांची संघटना ते काम करू शकते. काही खेळाडू फारसे शिकलेले नसतात किंवा काहींकडे इंटरनेटची सुविधा नसते. त्यामुळे हे खेळाडू स्वतः फॉर्म भरू शकत नाहीत. त्याऐवजी त्यांच्या खेळाची संघटना त्यांच्यावतीने हा फॉर्म भरते, असे नवीन अग्रवाल यांनी सांगितले.

क्रिकेटपटू सुशिक्षित असतात आणि ते स्वतः फॉर्म भरू शकतात. मात्र, कदाचित त्यांच्याकडे वेळ नसावा किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे ते फॉर्म भरू शकत नसतील, तर बीसीसीआयने त्यांच्या राहण्याच्या ठिकाणाची माहिती देण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. परंतु, मागील तीन महिन्यांची माहिती बीसीसीआयने दिली नाही. याचे स्पष्टीकरण देताना पासवर्ड संदर्भात गडबड झाल्याने माहिती देण्यास विलंब झाल्याचे बीसीसीआयने सांगितले असून हे कारण पटण्यासारखे आहे. परंतु, आम्ही याबाबत अधिक विचार करुन योग्य तो निर्णय घेऊ, असेही अग्रवाल म्हणाले. खेळाडूंना आपल्या ठिकाणाची माहिती देणे अनिवार्य आहे. तसे तीन वेळा न केल्यास खेळाडूवर दोन वर्षांच्या निलंबनाची कारवाई होऊ शकते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -