घरक्रीडाFrench Open : नाओमी ओसाकाने घेतली स्पर्धेतून माघार; सेरेना विल्यम्सचा पाठिंबा

French Open : नाओमी ओसाकाने घेतली स्पर्धेतून माघार; सेरेना विल्यम्सचा पाठिंबा

Subscribe

मी या स्पर्धेतून माघार घेणे हे ही स्पर्धा, इतर खेळाडू आणि माझ्या आरोग्याच्या हिताचे आहे, असे ओसाका म्हणाली.

जपानची स्टार टेनिसपटू नाओमी ओसाकाने फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धेतून माघार घेतली आहे. ओसाकाने सोशल मीडियावरून याबाबतची माहिती दिली. मानसिक आरोग्यामुळे ओसाकाने यंदाच्या स्पर्धेत माध्यमांशी बोलण्यास नकार दिला होता. प्रत्येक टेनिसपटूला सामन्यानंतर माध्यमांशी बोलणे बंधनकारक असते. परंतु, रविवारी झालेल्या पहिल्या फेरीच्या सामन्यात रोमेनियाच्या मारिया पॅट्रिसिया टिगचा पराभव केल्यानंतर ओसाकाने माध्यमांशी बोलणे टाळले होते. त्यामुळे तिला १५ हजार डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला होता. तसेच पुढेही अशीच वागणूक सुरु ठेवण्यास स्पर्धेबाहेर करण्याची ताकीदही ओसाकाला देण्यात आली होती. परंतु, तिने स्वतःहून फ्रेंच ओपनमधून माघार घेतली. अमेरिकेची महान टेनिसपटू सेरेना विल्यम्सने तिला पाठिंबा दर्शवला आहे. मी तिची मनस्थिती समजू शकते, असे विल्यम्स म्हणाली.

ओसाका सोशल मीडियावर काय म्हणाली?

मी या स्पर्धेतून माघार घेणे हे ही स्पर्धा, इतर खेळाडू आणि माझ्या आरोग्याच्या हिताचे आहे. त्यामुळे आता सर्वांना पॅरिसमध्ये सुरु असलेल्या या टेनिस स्पर्धेवर लक्ष केंद्रित करता येईल. माझ्यामुळे लोकांचे लक्ष विचलित व्हावे हा माझा कधीही हेतू नव्हता. तसेच मला बहुधा योग्य वेळ साधता आली नाही आणि मी माझा संदेश अधिक स्पष्ट केला पाहिजे होता. परंतु, मानसिक आरोग्य हा शब्द क्षुल्लक कारणासाठी आणि अगदी सहजपणे कधीच वापरणार नाही, असे ओसाका म्हणाली.

- Advertisement -

काही काळ टेनिसपासून दूर राहणार  

तसेच २०१८ अमेरिकन ओपन स्पर्धेनंतर नैराश्य आल्याचेही ओसाकाने या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले. आता तिने फ्रेंच ओपन स्पर्धेतून माघार घेतली असून ती काही काळ टेनिसपासून दूर राहणार आहे. याआधीही ओसाकाने सोशल मीडियावर पोस्ट लिहीत, लोकांना खेळाडूंच्या मानसिक आरोग्याची जराही चिंता नसते अशी टीका केली होती. त्यामुळे फ्रेंच ओपनमध्ये पहिल्या फेरीतील विजयनानंतर तिने माध्यमांशी बोलण्यास नकार दिला होता.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -