घरक्रीडाराष्ट्रीय कॅरम स्पर्धा

राष्ट्रीय कॅरम स्पर्धा

Subscribe

प्रशांत मोरे, रश्मी कुमारी अजिंक्य

कुडाळ येथे झालेल्या राष्ट्रीय आणि आंतर राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात रिझर्व्ह बँकेच्या प्रशांत मोरेने विदर्भाच्या इर्शाद अहमदला २२-२१, २५-१३ असे सरळ दोन सेटमध्ये पराभूत करून आपल्या पहिल्या राष्ट्रीय विजेतेपदाला गवसणी घातली. तिसर्‍या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत रिझर्व्ह बँकेच्याच माजी राष्ट्रीय विजेत्या झाहीर पाशाने महाराष्ट्राच्या राजेश गोहीलला पराभूत केले. या सामन्याचा पहिला सेट १०-२५ असा गमावल्यानंतरही झाहीरने पुढील दोन सेट २३-१०, २५-५ जिंकत ही लढतही जिंकली.

महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्डाच्या रश्मी कुमारीने जैन इरिगेशनच्या ऐशा महम्मदला १९-७, २५-७ अशी धूळ चारत विजेतेपद पटकावले. रश्मीचे हे १० वे राष्ट्रीय विजेतेपद असून, कॅरममध्ये सर्वाधिक राष्ट्रीय विजेतेपदाचा विक्रम तिच्या नावावर झाला आहे. यापूर्वी ९ वेळा राष्ट्रीय विजेतेपद पटकावण्याचा विक्रम तामिळनाडूच्या ए. मारिया इरुदयमच्या (इंडियन एरलाईन्स) नावे होता. महिलांच्या तिसर्‍या क्रमांकाच्या लढतीत विश्व विजेत्या एस. अपूर्वाने जैन इरिगेशनच्या नीलम घोडकेला २५-९, २०-२५, २५-४ असे पराभूत केले.

- Advertisement -

महिला वयस्कर गटाच्या अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या मालती केळकरने महाराष्ट्राच्याच रोझिना गोदादला ६-२२, १९-१३, १५-१२ असे नमवून जेतेपद पटकावले. पुरुष वयस्कर एकेरीच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या शब्बीर खानाने महाराष्ट्राच्या अस्लम चिकतेला २५-७, २५-८ असे पराभूत केले.

विजेत्यांना रोख पारितोषिके आणि चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील व्हाईट स्लॅम आणि ब्लॅक स्लॅम करणार्‍या सर्व खेळाडूंना आंतरराष्ट्रीय कॅरम महासंघाचे अध्यक्ष जोसेफ मेयर यांनी प्रत्येकी ५० डॉलर्स, तर कुडाळ तालुका कॅरम संघटनेने कोकणी मेव्याचे डबे दिले. सिस्का कॅरम कंपनीतर्फे चारही विजेत्यांना सिस्का फायटर बोर्ड भेट देण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -