भारतीय रेल्वेची गाडी सुसाट; सेनादलाचा पराभव करत पटकावले जेतेपद

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा

National kabaddi

भारतीय रेल्वेने सेनादलाचा ४१-१७ असा धुव्वा उडवत राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या चषकावर आपले नाव कोरले. या स्पर्धेतील हे त्यांचे २२ वे जेतेपद आहे. ४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर त्यांना हे यश लाभले आहे. याआधी २०१३ मध्ये मंडया, कर्नाटक येथे झालेल्या स्पर्धेत त्यांनी सेनादलालाच पराभूत करत जेतेपद मिळवले होते.

रेल्वे आणि सेनादलमधील अंतिम सामना प्रो-कबड्डीत सर्वाधिक गुण मिळवणार्‍या पवन कुमार शेरावतने आपल्या झंजावाती चढायांनी, तर गतवर्षी आपल्या अभेद्य बचावाने सर्वाधिक पकडीचे गुण मिळविणार्‍या रविंदर पहलने गाजवला. या सामन्याच्या सुरुवातीपासूनच रेल्वेने चांगला खेळ केला. सामन्याच्या १५ व्या मिनिटाला सेनादलावर लोण देत रेल्वेने १७-०९ अशी आघाडी घेतली. मध्यंतराला रेल्वेकडे भक्कम आघाडी होती. मध्यंतरानंतर ९ व्या मिनिटाला लोण देत रेल्वेने २७-१३ अशी आपली आघाडी वाढवली. यानंतर सेनादलाचा खेळ अधिकच खालावला आणि रेल्वेने हा सामना जिंकला.

रेल्वेच्या या विजयाचा पवन कुमार शेरावत खरा नायक ठरला. त्याने १९ चढायांमध्ये एका बोनस गुणासह ७ गुण मिळवले, तर रविंदर पहलने ७ पकडी करत त्याला चांगली साथ दिली. रेल्वेच्या भक्कम बचावामुळे सेनादलाचा स्टार चढाईपटू मोनू गोयतला सूर सापडलाच नाही. त्याने १३ चढाया केल्या. त्यात तो ९ वेळा पकडला गेला. त्याआधी उपांत्य सामन्यात सेनादलाने हरियाणाचा ५२-३८ असा, तर रेल्वेने यजमान महाराष्ट्राचा ४७-२० असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली होती.